– गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचा अभिनव उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी घडावेत, समाजात उन्नती व्हावी, यासाठी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याकडून अनोखा उपक्रम राबवला जात असून त्यांच्याकडून यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण परीक्षाअर्थींना पुढील अभ्यासासाठी करमाळा पंचायत समितीचे अर्थसहाय दिले जात आहे.
प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सामाजिक जाण, सामाजिक भान असले की समाजाचा सर्वांगीण विकास होतो. हा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. असेच समाजभान असणारे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत करमाळा तालुक्यात एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षातून अधिकारी घडावेत यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यूपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अभ्यासू तरुण स्पर्धा परीक्षेत चमकावेत, त्यांना पुढील अभ्यासासाठी पुस्तके खरेदी करता यावेत, यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून यूपीएससी साठी 10 हजार तर एमपीएससी साठी 5 हजार रुपये अर्थसहाय देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी ही सुरू केली आहे. आजपर्यंत करमाळा तालुक्यातील २५ हून अधिक अभ्यासू तरुणांना करमाळा पंचायत समितीच्या या ‘दिलासा योजनेतून’ आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे.
१५ व्या वित्त आयोगातून करमाळा पंचायत समिती स्तरावर प्राप्त होणाऱ्या अबंधित निधीतून ‘दिलासा योजने’ अंतर्गत यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थींना अर्थसहाय्य करण्यात येत आहे. या रकमेतून मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी पुस्तके खरेदी, शिकवणी फी देण्याकरिता डीबीटी तत्त्वावर अनुदान या योजनेतील पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वितरित केले जात आहे. हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषदेने पंचायत समिती पातळीवर राबविण्याची अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी ‘एक दिवस आजी-आजोबा सोबत’ उपक्रम
– मनोज राऊत यांनी लातूर जिल्ह्यातील देवणी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक उपक्रम राबविले. त्यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुक्यातील शाळांमध्ये महापुरुषांच्या जयंती सोबतच शास्त्रज्ञांच्या जयंती साजरा केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना त्या शास्त्रज्ञांच्या कार्याची ओळख व्हावी. हाच त्यामागील उद्देश आहे. याबरोबरच बोलीभाषेतील लोप पावत चाललेले शब्द जतन करण्यासाठी त्यांनी ‘एक दिवस आजी-आजोबा सोबत’ हा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवून लोप पावत चाललेल्या २३ हजार शब्द, २ हजार म्हणींसह इतर माहीतींचे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाला खा. सुप्रिया सुळे यांची प्रस्तावना असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षेचा टक्का वाढावा हाच हेतू
– माझे गाव करमाळा तालुक्यातील घोटी. आपल्या तालुक्यातील पर्यायाने सोलापूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढावा हाच यामागील हेतू आहे. यातूनच हा उपक्रम आपण सुरू केला असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्यासह करमाळा तालुक्यातील सर्वांचे सहकार्य लाभत असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले.