सत्ताकारण न्युज नेटवर्क टीम
Jasprit Bumrah| स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल 11 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करताना त्याने संघाला विजय तर मिळवून दिलाच पण स्वत:ही अप्रतिम कामगिरीही केली.
बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीला (4) तर लॉर्कन टकरला (0) धावांवर बाद केले. बुमराहने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाच्या पदार्पणात एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांच्या क्लबमध्येही एन्ट्री मारत एक अनोखा इतिहास रचला आहे.
Jasprit Bumrah हा पहिला भारतीय क्रिकेटर बनला आहे, ज्याने टी-20 मध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करताना सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. बुमराहच्या आधी 8 भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कर्णधारपदाच्या पहिल्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला, परंतु त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही.
भारतीय कर्णधार म्हणून पहिला टी-20 सामना जिंकणारा Jasprit Bumrah हा नववा खेळाडू आहे. सेहवाग हा पहिला कर्णधार आहे. त्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात ही कामगिरी केली होती. टीम इंडियाचा हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. धोनीशिवाय सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शिखर धवन, हार्दिक पांड्या, केएल राहुल यांची नावे कर्णधार म्हणून पहिला टी-20 सामना जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहेत.
Jasprit Bumrah ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 139/7 पर्यंत रोखले. यजमानांसाठी बॅरी मॅकार्थीने 33 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू आहे. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 6.5 षटकांत 47/2 धावा केल्या आणि पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजेता घोषित करण्यात आले.