-अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
सोलापूर : प्रतिनिधी
कणबस (गं.) ता. द. सोलापूर ग्रामपंचायतीत विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. निधीचा अपहार झाला आहे. तरी येथील निधीच्या अपहाराची चौकशी करून संबंधीतांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार, असा इशारा येथील नागरिक प्रभुलिंग बिराजदार यांनी लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.
तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, कणबस (गं.) ता. द. सोलापूर ग्रामपंचायतीत पेयजल योजना, रस्ता काँक्रीटीकरण, रोजगार हमी योजना, तंटामुक्ती निधीत सरपंच सिध्दाराम नारायण थोरात आणि ग्रामसेवक बागवान यांनी संगणमताने भ्रष्टाचार केला आहे. विविध योजनांसाठी 48 लाख 82 हजार रूपये निधी मंजुर होता. तो निधी हडप केला आहे. रस्त्याची कामे निकृष्ठ पध्दतीने केली आहेत. रोजगार हमीत बोगस नावे टाकूण बिले उचलली आहेत. तसेच इतर विविध योजनांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार केला आहे. तरी सरपंच सिध्दाराम नारायण थोरात आणि ग्रामसेवक बागवान यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार प्रभुलिंग बिराजदार यांनी केली आहे.
40 वर्षांतील कामांचीही तपासणी करावी
संबंधीत सरपंच व त्यांच्या कुटूंबाची सत्ता गेल्या 40 वर्षांपासून आहे. त्यामुळे या 40 वर्षांत विविध योजनांमध्ये अशाच प्रकारे भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या कालावधीतील कामांची, योजनांची चौकशी करावी. -प्रभुलिंग बिराजदार, नागरिक, कणबस (गं.)