-आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांची माहिती | डॉ. पिंपळेंना म्हणणे सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत

सोलापूर : प्रतिनिधी
शासनाने प्रत्येक जिल्ह्यात लस भांडारसाठी सुमारे अडीच कोटी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही सोलापूर जिल्ह्यात अद्यापही लस भांडार उभारण्यात आले नाही. परिणामी याला जबाबदार असलेल्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना बडतर्फ करण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांच्याकडे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी मेलव्दारे केली होती. त्याअनुषंगाने आयुक्तांनी चौकशी समिती नेमली असून डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना म्हणणे सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली असल्याची माहिती आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांनी “सत्ताकारण”ला दिली.
छावा संघटनेने दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले होते की, सोलापूर जिल्हयाजवळील धारशिव या दुष्काळी जिल्ह्यात सदरचे लस भांडार पूर्णत्वाच्या दिशेने वाट चाल करीत आहे. सोलापूर जिल्ह्यात लस भांडारसाठी कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. लस भांडारसाठी लागणारी जागा अंतिम करणे हे कामही डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांनी केलेले नाही. डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे सोलापूर जिल्ह्यात लस भांडार तयार होऊ शकले नाही. डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांनी लस भांडारासाठी कागदी घोडे नाचविणे यापलीकडे कोणतेही काम केले नाही. सदर कामासाठी जोपर्यंत त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांची इच्छा होत नाही, तोपर्यत सदर कामकाज लांबणीवर टाकण्यात डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांचे मनसुबे आहेत. केवळ जागेसाठी पत्रव्यवहार करून ठेवलेला आहे. ज्याना हा पत्र व्यवहार केलेला आहे, त्या सबंधित अधिकारी यांना खाजगीमध्ये भेटून जागेची तत्काळ आवश्यकता नसल्याचे डॉ. पिंपळे हे सांगतात. त्यामुळे अनेक वर्ष होऊनही सोलापूर जिल्ह्यात अद्यापी लस भांडार स्थापित झालेले नाही.
शहर-जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात लस भांडाराची अत्यंत गरज आहे. परंतु डॉ. पिंपळे यांच्याकडून यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या व शासकीय यंत्रणेचे आदेश पालन न करणाऱ्या डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांची वरील तक्रारीनुसार चौकशी करण्यात यावी आणि त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांच्याकडे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी केली होती. परिणामी आयुक्त डॉ. लाळे यांनी चौकशी समिती नेमूण या प्रकरणाशी संबंधीत डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना म्हणणे सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. डॉ. पिंपळे यांनी म्हणणे सादर केल्यानंतर चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल. त्यानंतर चौकशी समितीच्या अहवालानुसार योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांनी “सत्ताकारण”ला दिली.