सोलापूर : प्रतिनिधी
सध्या तरुणाईमध्ये कमी गुंतवणूक करून जास्तीचा नफा कमावण्याची मानसिकता वाढत चालली आहे. या मानसिकतेमुळे अवैद्य धंद्याकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे. याचाच फायदा घेत नवीन घरकुल, वळसंग गाव, होडगी गाव, कुंभारी आदी ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
या अवैध व्यवसायाकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष, यामुळे अवैध व्यवसायांना जणू चालना मिळत आहे. वळसंग हद्दीतील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे आता अनेक गावांमध्ये अवैध धंद्यांना पोलिसांनी एनओसीच दिली आहे की काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. अवैध धंदेवाल्यांना एवढे धाडस नेमके कुठून येते ? या सर्व धंद्यांना नेमका आशिर्वाद कोणाचा ? या काळाबाजाराला मोकळीक देण्या मागचा मास्टर माईंड कोण ? हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्यांचे आहे. वळसंग हद्दीत अवैध मटका, अवैध घरगूती गॅसचा काळा बाजार, अवैध जुगार अड्डा, अवैध पेट्रोल विक्री हे सर्रास सुरू आहेत.