किळसवाणा : हॉस्पिटल शेजारीच लघुशंका, शौचाची घाण, दुर्गंधी; रुग्णांसह नागरिकही त्रस्त
जिल्हाधिकारी, पोलीस, सोमपा आयुक्तांकडे तक्रार ; सर्व संबंधितांवर कारवाईची मागणी
By assal solapuri ।।
सोलापूर: सिव्हील हॉस्पिटलजवळील आडके हॉस्पिटलच्या समोरच घाण, दुर्गंधी, रस्त्यावरच लघुशंका करणे , शौचास बसणे अशा घाणेरड्या प्रकाराने रुग्णांसह सर्व सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. अक्षरशः येथून ये-जा करणे म्हणजे नाक बंद करूनच जावे लागते. अशा या दुर्गंधीयुक्त परिसराला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार करूनही काही फरक पडत नसल्याचे आडके हॉस्पिटलचे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलजवळ रस्त्यावरील कचरा, जनावरांची अनधिकृत कत्तलीच्या सार्वजनिक उपद्रवाबद्दल जिल्हाधिकारी, पोलीस व सोमपा आयुक्तांकडे तक्रार केल्याचेही डॉ. आडके यांनी सांगितले.
चोवीस तास रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा, वैद्यांच्या पानांच्या कचऱ्याची ढीग, त्यामुळे तेथे कुत्रे, मोकाट कुत्री, गाढवांसह इतर मोकाट जनावरांचा वावर होत आहे. त्यांचाही उपद्रव वाढला आहे. शेजारीच एक मुतारी आहे. पण त्याचा गैरवापर होऊन सर्रास लोक रस्त्यावरच लघुशंका करणे, रस्त्यावर शौचास बसणे अशा घाणेरड्या प्रकरणामुळे येथून जाणे मुश्किल झाले आहे. रहदारीस अडथळा होत आहे. शेजारीच सिव्हिल हॉस्पिटल व निवासी डॉक्टरांचे वसतीगृह आहे. तसेच बाजूलाच अनेक हॉस्पिटल्स व इमारती आहेत.
जनावरांची अनधिकृत कत्तलीचा दुर्गंधीयुक्त घाण या ठिकाणी टाकलेली आहे. त्याबाबत डॉ.संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी, सोमपा आयुक्त व सदर बजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणे, शहराचे विद्रुपीकरण करणे, अनधिकृत प्राण्यांची विक्री व कत्तल करणे यावर फौजदारी गुन्हा व महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ प्रमाणे कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. तसेच कर्तव्यात कसूर करण्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व संबंधित कर्मचारी, अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन मक्तेदारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोलापूर स्मार्ट सिटीत असे घाणेरडे प्रकार सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना आणि प्रतिबंधन न झाल्यास पुढील अतिशय कठोर पावले उचलण्याचा इशारा डॉ.आडके यांनी दिलेला आहे.