दि.३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा:समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जिल्ह्यातील चर्मोद्योग व्यवसाय करणाऱ्या गटई कामगांराना १०० टक्के अनुदानावर पत्र्यांचे स्टॉल वाटप करण्यासाठी दि. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले.
राज्यामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरूस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीच्या व्यक्ती असून, त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न त्यांच्याशी निगडीत आहे. सदर पादत्राणे दुरूस्ती करणारे व्यावसायिक हे रस्ताकडेला ऊन्हापावसात बसून आपली सेवा देत असतात. या व्यावसायिकांना ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक ऊन्नती व्हावी, यासाठी १०० टक्के शासकीय अनुदानावर गटई मागारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून राबविण्यात येते.
अटीशर्ती याप्रमाणे :
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी व अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रुपये व शहरी भागासाठी 50 हजार रुपयापेक्षा अधिक नसावे.(यासाठी तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक राहिल), अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगर पालिका यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती स्वमालकीची असल्यास भाडेचिठ्ठी, कराराची प्रत किंवा खरेदीखताची साक्षांकित प्रत सादर करावी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक पात्र लाभार्थ्यानी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण, सोलापूर यांच्या कार्यालयाकडे दि.३१ डिसेंबरपर्यंत दाखल करावेत, अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.