पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार आणि सचिन शिंदे.
सोलापूर : प्रतिनिधी
अलीकडच्या काळात सायबर क्राईम खूप वाढले आहे. विद्यार्थी व नागरिकांनी इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, संगणक, लॅपटॉप हाताळताना जागरूक राहावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था आणि पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सिक्युरिटी’ जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. काळे या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
पुढे पोलीस उपायुक्त डॉ. काळे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ही बाब खूप कौतुकाची आहे. सायबर साक्षरता होणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी अर्धवट ज्ञान खूप धोकादायक असल्याचे नमूद केले. त्यामुळे सोशल मीडिया तसेच मोबाईल हाताळताना ओटीपी असो अथवा कोणतीही गोष्ट असो त्याची खातरजमा करूनच या बाबी करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सायबर सिक्युरिटीविषयी पीएसआय नळेगावकर आणि पोलीस वसीम शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. गादेवार यांनीही सायबर क्राईमचे प्रमाण वाढल्याचे सांगून याबाबत सर्वांनी सजग होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कोणतीही माहिती ऑनलाईन पद्धतीने देताना त्याची संपूर्णपणे चौकशी करावी. जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये, याविषयी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रयास संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले. आभार सहायक कुलसचिव आनंद पवार यांनी मानले. यावेळी अॅङ संतोष चव्हाण, ऋषिकेश माळशिकारे, निलेश सोनवणे, राहुल वङतिले, आकाश जमादार आदी उपस्थित होते.