-नवनियुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या माता आरोग्य, बाल आरोग्य, जननी सुरक्षा योजना आदी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. त्या-त्या योजनांचा लाभ सर्व गरजू लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत नवनियुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गोविंद नवले यांनी व्यक्त केले.
जि. प. सोलापूर आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी या रिक्त पदी डॉ. संतोष गोविंद नवले यांची नियुक्ती 30 जून 2023 रोजी करण्यात आल्याचा आदेश 5 जुलै 2023 रोजी आरोग्य विभागास प्राप्त झाला. सदरच्या पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आरोग्याच्या योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती मा. मुख्यमंत्री यांनी वाढवली आहे. यातील उपचार दीड लाखावरून पाच लाखापर्यंत केले आहेत. याही योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार तळागाळातील लोकांपर्यंत करून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणी या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार करण्यात येईल, असे मत डॉ. नवले यांनी व्यक्त केले.
आदेश नसतानाही डॉ. बागडेंचा खुर्चीवर दावा
आरोग्य विभागात “जिल्हा आरोग्य अधिकारी” पदाच्या खुर्चीचा खेळ रंगला होता. यामध्ये डॉ. शितलकुमार जाधव यांचे निलंबन झाल्यानंतर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सोनिया बागडे यांची नेमणूक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केली होती. तर याच दरम्यान आषाढी वारीमध्ये राबवण्यात येत असलेल्या महाआरोग्य शिबिराच्या कामकाजासाठी अत्यावश्यक बाब म्हणून डॉ. नवले यांच्याकडे जि. प. सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार 19 जुन 2023 रोजी पुढील आदेश येईपर्यंत देण्यात आला होता. तसा आदेश आरोग्य सेवा आयुक्तालय, मंबईचे सहसंचालक (अ व प्र) तुळशीदास सोळंके यांनी काढला होता. त्यामुळे आषाढी वारीतील महाआरोग्य शिबिरानंतर डॉ. नवले हे जि. प. आरोग्य विभागात 5 जुलै 2023 रोजी रूजू झाले. यावेळी डॉ. बागडे यांनी वारी संपली आहे. तुमचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारीपदी मीच असून कार्यभार सोडण्यासाठी डॉ. नवले यांच्याशी बोलल्या. परंतु डॉ. नवले यांनीही पुढील आदेश येईपर्यंत माझीच नेमणूक असल्याचे डॉ. बागडे यांना सांगितले. हाच वाद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यापर्यंत पोहचला. त्यांनीही मार्गदर्शन मागविले. परंतु त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या दरम्यान 30 जून 2023 रोजीचे बदलीचे आदेश 5 जुलै 2023 रोजी जि. प. आरोग्य विभागास प्राप्त झाले. ज्यामध्ये डॉ. नवले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करणारा शासन निर्णय होता. तर डॉ. सोनिया बागडे यांची जिल्हा क्षयरोग अधिकारी, धुळे या रिक्त पदी बदली झाली. परंतु आदेश नसताना डॉ. बागडेंनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाच्या खुर्चीवर सांगितलेल्या दाव्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली. तसेच डॉ. बागडे या सक्षम असत्या, तर ऐन आषाढी वारीत महाआरोग्य शिबिराच्या नियोजनासाठी त्यांना डावलून धुळ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार देण्याची नामुष्की का आली ? असा प्रश्न जिल्हा परिषदेत चर्चिला जात आहे.
कंत्राटी महिला कर्मचाऱ्याची लुडबुड
डॉ. नवलेंचा आषाढी वारीचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. बागडे याच आहेत. नवलेंनी पदभार सोडायला हवा. सीईओंनी डॉ. बागडे यांनाच त्या खुर्चीवर बसवावे, यासाठीचा अट्टाहस एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठांपर्यंत केला. यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठीच्या नियुक्तीत नाहक लुडबुड करणाऱ्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती. मात्र डॉ. नवले यांच्या नियुक्तीचा आदेश आल्याने पुढील नाट्य थांबले.