उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या पत्राला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून केराची टोपली

-पुणे विभागास सक्षम उपसंचालकांची गरज

सोलापूर : प्रतिनिधी

येथील माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांच्या विविध तक्रारी वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी पुणे विभागाच्या उपसंचालकांना दिले आहे. त्यामुळे पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी तत्कालीन प्र. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशी संदर्भात पत्र पाठवले होते. परंतु त्यांच्या पत्राची दखल तत्कालीन प्र. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घ्यावी वाटली नाही. त्यांच्या दोन्ही पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे साधा प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारीही उपसंचालकांच्या पत्राला जुमानत नसल्याने पुणे विभागास सक्षम उपसंचालकांची गरज असल्याची चर्चा खुद्द आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेत रंगली आहे.

घडलेली घटना अशी की, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सोलापूर येथे कार्यरत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांच्या विविध तक्रारी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, उपसंचालकांपर्यंत दाखल झाल्या आहेत. छावा संघटनेचे गणेश मोरे, जि. प. चे माजी सदस्य भारत शिंदे आदींनी तक्रारी केल्या आहेत. ज्यामध्ये डॉ. अनिरूध्द पिंपळे हे गेल्या 25 वर्षांपासून सलग सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असणे, याचा गैरफायदा घेत प्रचंड प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार करणे, अवैध मार्गाने संपत्ती गोळा करणे, सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी अनेक माता व अर्भक व बाल मृत्यू होत आहेत. या सर्व मृत्यूची सखोल चौकशी होणे करणे, ठराविक माता मृत्यू व बालक मृत्यू यांची माहिती सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व जिल्हाधिकारी (Collector) यांची दिशाभूल करणे, कोरोना काळात डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी सोलापूर जिल्हयासाठी प्राप्त होणाऱ्या लसी साठवणूक करण्याकरीता प्राथमिक आरोग्य् केंद्राचा वापर जिल्हा लस भांडार म्हणून केला आहे. येथे विज गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची बॅकअपची व्यवस्था नव्हती. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात लस साठा वाया गेला आहे. त्यांकडून संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक उपस्थिती शिवाय अदा केले जात आहे. त्यामुळे या विविध तक्रारींच्या अनुषंगाने डॉ. पिंपळे यांना निलंबीत करून चौकशीअंती बडतर्फ करा, अशी मागणी तक्रारीत केली आहे.

या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांनी चौकशी समिती नेमून याची जबाबदारी पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे दिली आहे. याअनुषंगाने उपसंचालक डॉ. पवार यांनी सदरच्या प्रकरणाची चौकशी करून 7 दिवसांत अहवाल सादर करावा, असे पत्र तत्कालीन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांना पाठवले होते. परंतु डॉ. सोनिया बागडे यांच्याकडून या पत्राची दखल घेतली गेली नाही. परिणामी उपसंचालकांनी पुन्हा स्मरणपत्र पाठवले. त्याचीही दखल डॉ. बागडे यांनी घेतली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सहा महिन्यांपूर्वी तक्रारी देऊनही अद्याप कारवाई तर नाहीच. परंतु चौकशीही पूर्ण झाली नाही. एखाद्या प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून उपसंचालकांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे पुणे विभागास सक्षम उपसंचालकांची गरज असल्याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेत रंगली आहे. यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे हे चौकशी अधिकारी बदलणार की तत्काळ चौकशी करून डॉ. पिंपळे यांच्याविरोधात कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

डॉ. सोनिया बागडेंचे मौन

-डॉ. अनिरूध्द पिंपळे यांच्याविरोधात उपसंचालकांनी लेखी पत्र पाठवूनही अहवाल पाठवला नाही. याबाबत तत्कालीन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी मौन बाळगत प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ केली.

संघटनेने चौकशी न करण्याची विनंती केली; तरीही चौकशीचे आदेश

-डॉ. पिंपळे यांच्याबाबत आलेल्या तक्रारी अर्जावर चौकशी करू नये. असे पत्र महाराष्ट्र राज्य नवनिर्मिती नर्सेस संघटनेने वरिष्ठ कार्यालयास पाठवले होते. एखाद्या जिल्ह्यातील संघटनेकडून वरिष्ठ कार्यालयास शहानपण शिकवण्याचा प्रकार सुरू असतानाच वरिष्ठांनीही या नर्सेस संघटनेची जागा दाखवून दिली असून तरीही चौकशी करण्याचे आदेश दिले असून चौकशीसाठी पाठवलेल्या पत्रात संघटनेच्या विरोधात म्हटले आहे की, “श्रीमती कलावती चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नवनिर्मिती नर्सेस संघटनेने 31 मार्च 2023 रोजी डॉ. पिंपळे यांच्याविरूध्द खोट्या तक्रारीची दखल घेवू नये, अशी विनंती केली आहे. तरी देखील डॉ. पिंपळे यांच्याबाबत तक्रारींची चौकशी करून चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व आवश्यक त्या दस्तऐवजासह आयुक्तालयास सादर करावा.” यामुळे आरोग्य विभागात नेहमीच एखाद्या संघटनेला हाताशी धरून काम करणाऱ्या डॉक्टरांनाही वरिष्ठांनी “डोस” दिल्याचे बोलले जात आहे.

 

हे ही वाचा :

लस भांडार उभारण्यात कुचराई केल्याबद्दल डॉ. पिंपळेंना बडतर्फ करा

 

लस भांडार उभारण्यात कुचराई केल्याबद्दल आयुक्तांनी नेमली चौकशी समिती

 

25 वर्षे एकाच जिल्ह्यात असलेल्या डॉ. पिंपळेंची जिल्हाबाह्य बदली करा

 

कोरोना काळात लस साठा वाया गेल्याने डॉ. पिंपळे यांच्यावर कारवाई करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *