COLLECTOR Kumar Ashirwad inspects flood-affected areas, damage caused by heavy rain
Heavy rainfall in 3 mandals of Mohol taluka & 4 mandals of Madha taluka on September 14
मोहोळ तालुक्यातील 3 तर माढा तालुक्यातील 4 मंडळात 14 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी
अस्सल सोलापुरी ||
HEAVY RAINFALL IN SOLAPUR DISTRICT : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (COLLECTOR KUMAR ASHIRWAD) यांनी विविध तालुक्यात पूरग्रस्त भागाची आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात दि. 10 सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी झालेली होती. दि.14 व 15 सप्टेंबर रोजी मोहोळ, माढा व करमाळा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेती, पिकांचे, घरांचे व अन्य बाबींचे नुकसान झालेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोहोळ, माढा व करमाळा तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. तालुका प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोळेगाव आष्टी बंधाऱ्यातून सीमा नदीमध्ये पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीचे पंचनामे लवकर करण्यात येतील. लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.


माढा तालुक्यातील कुर्डूवाडी, रोपळे, म्हैसगाव व रांजणी या चार मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यांनी कुर्डूवाडी जवळील अतिवृष्टीने ऊस पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. केळी बागेच्या नुकसानीची ही पाहणी करून केळी उत्पादक शेतकरी बालाजी शिरसकर यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडल्याने तांबे वस्ती पाण्यात जाऊन तेथील कुटुंब पाण्यात अडकले होते. जिल्हाधिकार्यांनी स्वतः पाण्यात थांबून संबंधित कुटुंबाला बचाव पथकामार्फत सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. स्थलांतर केलेल्या कुटुंबाला अन्नधान्य पुरवठा करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेती पिकाचे पंचनामे त्वरित करण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी तहसीलदार सचिन मुळीक यांनी मोहोळ तालुक्यातील मोहोळ, नरखेड व सावळेश्वर या तीन मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली. तहसीलदार संजय भोसले यांनी माढा तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाल्याचे सांगितले. शेती पीक नुकसानीचे प्राथमिक माहिती घेतली असून, त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्यात येईल, असे संबंधित तहसीलदार यांनी सांगितले.
