सीईओ स्वामींचे मुंबई दौरे वाढले
सोलापूर : रणजित वाघमारे
येथील जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाऊन आले आहेत. परिणामी ते “कलेक्टर” होण्यासाठी पात्र झाले असून त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांचे मुंबई दौरे वाढले असून “CM साहेब मला कलेक्टर करा…” यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सु. मो. महाडिक यांनी 3 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने व निवडीने नियुक्त झालेल्या राज्यातील 19 अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या 124 व्या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आदेश दिले होते. ज्यामध्ये सीईओ स्वामींचाही समावेश होता. हे प्रशिक्षण मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी येथे 13 ते 24 मार्च 2023 या काळात संपन्न झाले आहे. यासाठी झेडपीचे सीईओ स्वामी यांच्यासह राज्यातील 19 अधिकारी 10 फेब्रुवारी 2023 रोजी कार्यमुक्त होऊन प्रशिक्षणासाठी हजर राहिले. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांनी 10 फेब्रुवारी रोजी आपल्याकडील पदभार सक्षम अधिकाऱ्याकडे सोपविला.
प्रशिक्षण संपवूण सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 25 मार्च 2023 रोजी रुजू झाले आहेत. गेल्या दीडमहिन्यामध्ये त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे संपूर्ण कामकाज झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी पाहिले. मात्र प्रशिक्षणा दरम्यान मार्च एंडची हुरहुर प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या बऱ्याच सीईओंना लागली होती. शेवटी निधी खचार्चा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. अशातच बदल्यांचे वारे वाहत असल्याने यासाठीही धडपड सुरू होती व आहे. ज्यामध्ये सीईओ दिलीप स्वामी यांचाही सहभाग असून त्यांनी थेट मंत्रालय गाठले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्याची चर्चा आहे. आणि CM एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी थेट “CM साहेब मला कलेक्टर करा…” अशी हाक दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात CM यांच्या सहकार्याने “सीईओ स्वामी” हे कोणत्या जिल्ह्याचे “कलेक्टर स्वामी” होतील ? याकडे जिल्हा परिषद, सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.