चिखलीच्या मरिमाता देवीच्या यात्रेत लोटला जनसागर!
“मरिआई लक्ष्मीचं चांगभलं”च्या जयघोषात संपूर्ण चिखली नगरी दुमदुमली
||हणमंत चौधरी||
चिखली (ता. मोहोळ): राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य भाविक चिखलीचे ग्रामदैवत मरिमाता देवीच्या चरणी नतमस्तक झाले. मरिआई लक्ष्मीचं चांगभलं च्या जयघोषात संपूर्ण नगरी दुमदुमून गेली देवीच्या दर्शनाने भाविक भक्तिरसात चिंब झाल्याचे चित्र मोहोळ तालुक्यातील चिखली येथील मरिमाता देवीच्या यात्रेत शुक्रवार दि.२६ रोजी दिसून आले. मरिमाता देवीच्या चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाल्याने संपूर्ण चिखली गावचा परिसर भक्तीमय बनला. सकाळी दहा वाजल्यापासून देवीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती पावलेल्या मरिमाता यात्रेच्या पार्श्वभूमीवर गेले महिनाभर गावकऱ्यांनी, जय्यत तयारी केली होती. एसटी बसेस, खाजगी वाहनांमधून असंख्य भाविक मध्यरात्रीपासूनच देवीच्या दर्शनासाठी दर्शनासाठी दाखल झाले होते. त्यामुळे भाविकांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याने भाविकांना अल्पकाळात देवीचे दर्शन घेता येत होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मरिमाता देवीस भरजरी साडी, सुवर्णालंकारानी सजविण्यात आले होते. मंदिराचा गाभारा सुध्दा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला. मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. भाविकांना देवीचे दर्शन चांगल्या रितीने व्हावे यासाठी ग्रामस्थांनी विशेष सोय उपलब्ध करून दिली होती.
सकाळच्या सत्रात सुध्दा भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. देवीच्या दर्शनानंतर गृहोपयोगी, मिठाई, साहित्यांची खरेदी करण्यासाठी भाविकांचा भर असल्याचे दिसून आले. मरिमाता देवीच्या मंदिरात नवस बोलणे, फेडणे, तुलाभार करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. हॉटेल व्यावसायिक, मिठाई दुकाने यासह अनेक दुकाने थाटली आहेत. अन्य गृहोपयोगी साहित्याची , आकाश पाळणे, लहान मुलांना आकर्षून घेणारे विविध खेळ सुध्दा मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले होते. राजकीय पक्षांच्या स्वागत कमानीचे, बॅनर्स देखील लावण्यात आले होते. दुपारनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची जास्तीत जास्त गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे भाविकांसाठी एसटी प्रशासनाने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. एसटी गाड्या बरोबरच खाजगी सहा आसनी, तीन आसनी, अन्य खासगी वाहनांसाठी एक किलोमीटर अंतरावर वाहनतळाची सोय करण्यात आली होती.
चिखली गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतूकीची कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलीस पथके कार्यरत होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या पोशाखातील पोलिसांची गस्तही सुरू होती. आरोग्य, महसूल यंत्रणा पोलिसांसह अन्य शासनाच्या विभागाचे दाखल झाले होते. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले .