Chess World Cup | बुद्धिबळाचं सर्वांत महत्त्वाचं तत्व आहे. ‘मी चूक केली नाही, तर मला कुणी हरवू शकणार नाही. मी जोवर प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगलं खेळेन, तोवर मी जिंकण्याची शक्यता कायम राहील.’ भारताचा प्रज्ञानंद याच तत्त्वाला धरून खेळताना दिसतो.
यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत प्रज्ञानंद भारताचा आणि अख्ख्या स्पर्धेचाच हीरो ठरला. 18 वर्षांच्या प्रज्ञानंदला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. पण तो ही फायनल गाठणारा सर्वांत तरूण बुद्धिबळपटू ठरला.
Chess World Cup
प्रज्ञानंदसाठीच नाही, तर भारतीय बुद्धिबळासाठीच ही स्पर्धा नवी चैतन्य आणणारी ठरली.
Chess World Cup यश का महत्त्वाचं?
प्रज्ञानंदचं यश आणि मोठेपण समजून घेण्याआधी आपण ही विश्वचषक स्पर्धा का महत्त्वाची असते, ते पाहूया.
मुळात वर्ल्ड कप ही काही बुद्धिबळ जगज्जेतेपदाची स्पर्धा नाही. तर ही अशी स्पर्धा आहे जिथे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरून खेळून गेलेले, झोनल चॅम्पियन्स म्हणजे वेगवेगळ्या खंडांमधल्या स्पर्धा जिंकलेले साधारण दोनशे खेळाडू सहभागी होतात. म्हणजे तुम्ही युवा खेळाडू असला किंवा रेटिंग तुलनेनं कमी असलं तरी तुम्ही या स्पर्धेपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही पहिल्या तिघांत आलात, तर पुढे जगज्जेत्याला आव्हान देण्यासाठी कँडिडेट्स स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते.
Chess World Cup यामुळेच विश्वचषक स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे.
या स्पर्धेत बाद फेरी पद्धतीनं म्हणजे ड्रॉनुसार तुम्ही एक एक प्रतिस्पर्ध्याला हरवत पुढे जाता. नव्या फॉरमॅटनुसार प्रत्येक सामन्यात आधी दोन क्लासिकल म्हणजे पारंपरिक बुद्धिबळाचे डाव खेळले जातात. त्यात बरोबरी झाल्यास दोन जलद डाव मध्यम टाईम कंट्रोल पद्धतीनं (दोन्ही खेळाडूंना 25 मिनिटं, प्रत्येक खेळीसाठी दहा सेकंद) आणि पुन्हा बरोबरी झाल्यास दहा मिनिटांचे आणखी दोन डाव खेळले जातात. त्यातही निकाल लागला नाही, तर ब्लिट्झ प्रकारानं म्हणजे अतिशय झटपट बुद्धिबळाचे दोन डाव खेळले जातात. त्यानंतरही बरोबरी असेल तर तीन मिनिटांचा ब्लिट्झ डाव खेळला जातो. म्हणजे बुद्धिबळाच्या या सर्व प्रकारांत तुम्ही पारंगत असाल, तर जिंकण्याची संधी जास्त असते.
उपांत्य फेरीत चार भारतीय
गेली अनेक वर्षं अनेक भारतीय या स्पर्धेत खेळले आहेत. कारण राष्ट्रीय विजेता आणि झोनल चॅम्पियन्सनाही या स्पर्धेत प्रवेश मिळतो. परंतु यात आजवर केवळ विश्वनाथन आनंदच विजेतेपदापर्यंत पोहोचू शकला होता. इतर बहुतांश भारतीय खेळाडू आठ फेऱ्यांच्या या स्पर्धेत पहिल्या-दुसऱ्या फेरीपलीकडे जाऊ शकत नव्हते. क्वचितच काही खेळाडू तिसऱ्या फेरिपर्यंत होचू शकले होते. एखाद दुसऱ्या वेळेला भारतीय खेळाडू चौथ्या फेरीपर्यंत पोहोचू शकले होते. यावेळी मात्र अचानक खूपच वेगळा बदल झाल्याचं दिसतं. यावर्षी उपांत्यपूर्व फेरीत चार भारतीय पोहचले आहेत. म्हणजे अंतिम आठ खेळाडूंपैकी निम्मे एका देशाचे होते. त्यात चीनचा, रशियाचा किंवा पोलंड आणि इंग्लंड एकही खेळाडू नव्हता तर अमेरिकेचा एकच खेळाडू होता. त्यामुळे ही स्पर्धा लक्षणीय ठरली. त्याला कारण ठरलं ते भारताच्या तरूण बुद्धिबळपटूंचं खेळातलं प्रावीण्य.
Chess World Cup भारताच्या यशामागची कारणं
भारतीय बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप मोठी सुदैवाची घटना म्हणजे 2022 साली बुद्धिबळ ऑलिंपियाडचं आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आलं होतं. 2014 साली आपल्याला या स्पर्धेत मेडल मिळालं होतं, पण बहुतेकदा पदक मिळण्याची शक्यता कमी असायची. याचं एक कारण म्हणजे भारतात एरवी संघ निवडताना फक्त आंतरराष्ट्रीय क्रमवारीचा, इलो रेटिंगचा आधार घेतला जात होता. त्यामुळे दर ऑलिंपियाडला केवळ रेटिंगमध्ये आघाडीवर असलेल्या खेळाडूंना संधी मिळायची. त्यावेळी चांगलं खेळत असलेले खेळाडू मागे राहायचे. मग असं दिसायचं की आपले सर्वोत्कृष्ट खेळाडूही जिंकू शकत नाहीत, तर आपल्या खेळाचा दर्जा कुठेतरी खाली आहे. पण 2022 साली यजमानपद आपल्याकडे होतं. तुम्ही यजमान असता, तेव्हा तुम्हाला एक किंवा दोन संघ अधिक खेळवायची संधी मिळते. अन्य देश केवळ एकच संघ पाठवू शकतात. आणि भारतालाही तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली.