Chandrayaan-3 Update | चंद्रयान-3 च्या यशामागे आहेत इस्रोचे हे 7 शास्त्रज्ञ

chandrayaan-3 update

Image Source

Chandrayaan-3 Update | बुधवारी (23 ऑगस्ट) रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. परंतु चंद्रयान-3 च्या या यशामागे इस्रोचे हे 7 शास्त्रज्ञ आहेत. ज्याबद्दल तुम्हाला जाणून घेता येईल. 

आतापर्यंत भारताशिवाय इतर कोणत्याही देशाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे आता भारत देखील चंद्रावर जाण्यात यश मिळवलेल्या देशांच्या एलिट क्लबमध्ये सामील झालाय. चंद्रावर आपलं यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन हे देश आपलं यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात यशस्वी झाले आहेत.

याच महिन्यात रशियाने त्यांचं लुना-25 हे यान चंद्रावर पाठवलं होतं. हे यान चंद्रयान-3 च्या दोन दिवस आधी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होतं पण त्याचा अवकाशातच स्फोट झाला. यामुळे आता भारताच्या यशाचं जगभरातून कौतुक होत आहे. खुद्द रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचं अभिनंदन केलं आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी इस्रोचे अभिनंदन करताना म्हटलंय की, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग केल्याबद्दल अभिनंदन. चंद्रावर अंतराळ यानाचे यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश बनल्याबद्दल भारताचं अभिनंदन. या मोहिमेत आम्ही तुमचे भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे.”

भारताच्या या ऐतिहासिक यशामागे इस्रोच्या शेकडो शास्त्रज्ञांची मेहनत आहे, मात्र 7 शास्त्रज्ञ या संपूर्ण मोहिमेचा चेहरा आहेत.

Chandrayaan-3 Update 1. एस. सोमनाथ, इस्रोचे अध्यक्ष

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेमागे एस. सोमनाथ यांची मोठी भूमिका असल्याचं बोललं जातंय. गगनयान आणि आदित्य L1 या सूर्य मोहीमेसह इस्रोच्या इतर अंतराळ मोहिमांना गती देण्याचं श्रेयही त्यांनाच दिलं जातं.

एस. सोमनाथ हे इस्रोच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि लिक्विड प्रपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून कार्यरत होते. लिक्विड प्रपल्शन सिस्टीम सेंटर प्रामुख्याने इस्रोसाठी रॉकेट तंत्रज्ञान विकसित करते.

चंद्रयान 3 चं प्रक्षेपण करण्यात आलं तेव्हा एस. सोमनाथ म्हणाले होते, “चंद्रयान 3 त्याच्या अचूक कक्षेत पोहोचलं आहे आणि त्याने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. यान एकदम ठीक आहे…”

बुधवारी चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर एस. सोमनाथ म्हणाले, “चंद्रयान-2 च्या अपयशातून आम्ही खूप काही शिकलो आणि आज आम्ही यशस्वी झालो आहोत.”

सूर्याच्या मोहिमेवर जाणारं आदित्य L1 अंतराळयान पुढील महिन्यात श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाऊ शकते, असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, चंद्रयान-3 साठी पुढील 14 दिवस महत्त्वाचे आहेत.

Chandrayaan-3 Update 2. पी. वीरामुथुवेल

पी. वीरामुथुवेल हे चंद्रयान-3 चे प्रकल्प संचालक आहेत. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. त्यांनी चंद्रयान-3 आणि इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांसोबत समन्वयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. 2019 मध्ये त्यांनी या मोहिमेची जबाबदारी स्वीकारली.

Chandrayaan-3 Update

Image Source 

चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपणापूर्वी वीरमुथुवेल इस्रोच्या मुख्यालयात अंतराळ पायाभूत सुविधा कार्यक्रम कार्यालयात उपसंचालक होते. ते त्यांच्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्यासाठी ओळखले जातात.

वीरामुथुवेल यांनी चंद्रयान-2 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. नासासोबत समन्वय साधण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते तामिळनाडूमधील विल्लुपुरमचे रहिवासी असून त्यांनी मद्रास आयआयटीमधून शिक्षण घेतलं आहे. वीरामुथुवेल हे लँडरचे तज्ञ आहेत आणि त्यांनी विक्रम लँडरच्या डिझाइनमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे.

Chandrayaan-3 Update 3. कल्पना के. उपप्रकल्प संचालक, चंद्रयान-3

कल्पना के. यांनी चंद्रयान-3 टीमचं नेतृत्व केलं. कोरोना साथरोगाच्या काळातही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व आव्हानांना तोंड देत त्यांनी या मोहिमेचं काम पुढे नेलं. भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमामागे महिला अभियंत्याचा मोठा वाटा आहे. कल्पना यांनी चंद्रयान-2 आणि मंगळयान मोहिमेतही मुख्य भूमिका बजावली आहे.

पत्रकारांशी बोलताना कल्पना म्हणाल्या की, “आम्ही वर्षानुवर्षे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, आज आम्ही अचूक परिणाम साध्य केलाय.” “माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी हा सर्वात संस्मरणीय क्षण आहे. आम्ही आमचं ध्येय गाठलं आहे.”

Chandrayaan-3 Update 4. एम शंकरन, यूआर राव उपग्रह केंद्राचे संचालक

एम. शंकरन हे यूआर राव उपग्रह केंद्राचे प्रमुख आहेत आणि त्यांची टीम इस्रोसाठी सर्व उपग्रह बनवते. चंद्रयान-1, मंगळयान आणि चंद्रयान-2 उपग्रहांच्या निर्मितीमध्ये शंकरन यांचा सहभाग होता. चंद्रयानच्या तीन उपग्रहांचे तापमान संतुलित राहील याची खातरजमा करण्याची जबाबदारी शंकरन यांच्यावर होती. वास्तविक उपग्रहाचे कमाल आणि किमान तापमान तपासणे हा या संपूर्ण प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचा नमुना तयार करण्यात मदत केली ज्यावर लँडरच्या टिकाऊपणाची चाचणी घेण्यात आली होती.

कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, रिमोट सेन्सिंग, मेटीरियोलॉजी आणि इतर ग्रहांवरील संशोधन यासारख्या क्षेत्रात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जून 2021 मध्ये, त्यांनी इस्रोच्या सर्व उपग्रहांच्या डिझाइन आणि विकासावर देखरेख करण्यासाठी केंद्राचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

Chandrayaan-3 Update 5. एस. मोहन कुमार, मोहिमेचे संचालक

एस. मोहन कुमार हे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत आणि चंद्रयान-3 मोहिमेचे संचालक आहेत. मार्च 2023 मध्ये इस्रोच्या LVM3 M3 या मोहिमेअंतर्गत वन वेब कंपनीच्या 36 उपग्रहांचं यशस्वी व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आलं होतं, त्यावेळी संचालक म्हणून मोहन कुमार यांनी काम केलं होतं.

मोहन कुमार म्हणाले, “LVM3 M4 (चंद्रयान-3 प्रक्षेपित करण्याची मोहीम) या मोहिमेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ते मोठ्या वजनाच्या वस्तू अवकाशात नेऊ शकतं. टीमवर्कसाठी इस्रो परिवाराचे अभिनंदन.”

Chandrayaan-3 Update
Chandrayaan-3 landing

Chandrayaan-3 Update 6. एस. उन्नीकृष्णन नायर, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, संचालक

एस. उन्नीकृष्णन नायर हे केरळमधील तिरुवनंतपुरम येथील थुंबा विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे प्रमुख आहेत. या मोहिमेत त्यांना आणि त्यांच्या टीमला मोहिमेच्या संचालनाची जबाबदारी देण्यात आली होती.

जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) मार्क-III, जे आता लाँच व्हेईकल मार्क-III (LVM3) नावानं ओळखण्यात येतं, ते देखील विक्रम साराभाई स्पेस सेंटरने तयार केलं होतं. याच LVM3 रॉकेटच्या सहाय्यानं चंद्रयान-3 अवकाशात सोडण्यात आलं होतं.

Chandrayaan-3 Update 7. ए राजराजन, लाँच ऑथोरायझेशन बोर्डाचे प्रमुख

ए. राजराजन हे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक आणि शास्त्रज्ञ आहेत. मानवी अंतराळ मोहीम कार्यक्रम – गगनयान आणि एसएसएलव्हीच्या मोटरवर ते काम करत आहेत. प्रत्यक्षात लाँच ऑथोरायझेशन बोर्ड प्रक्षेपणासाठी ग्रीन सिग्नल देते. इस्रोच्या माहितीनुसार, चंद्रयान-3 मोहिमेत 54 अभियंते आणि शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *