पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत जिल्हास्तरीय  कार्यक्रमात बँकाचा गौरव 

अटल पेन्शन योजना (एपीवाय) जिल्हास्तरीय आऊटरीच कार्यक्रम

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :   पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए), नवी दिल्ली अंतर्गत राज्यस्तरीय बँकर्स समिती, पुणे (एसएलबीसी) आणि जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर यांच्यावतीने अटल पेन्शन योजना (एपीवाय) जिल्हास्तरीय आऊटरीच कार्यक्रम बालाजी सरोवर, सोलापूर येथे पार पडला.

या कार्यक्रमासाठी पीएफआरडीएचे मुख्य महाप्रबंधक परवेश कुमार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी समाजातील संगठीत व असंगठीत वर्गाला कशाप्रकारे अटल पेन्शन योजना फायदेशीर राहील, याविषयी मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच सर्व बँकांनी मिळून सोलापूर जिल्ह्यासाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दिलेले लक्ष्य १२२ टक्केवारीसह प्राप्त केल्याबबद्दल, सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँका व जिल्हा अग्रणी बँकेचे अभिनंदनही केले.

====================================================================================

उत्कृष्ट कामिगीरीबद्दल बँकांचा गौरव

सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांपैकी विशेषतः प्रामुख्याने बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, विदर्भ कोंकण ग्रामीण बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कर्नाटक बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक या आठ बँकांना त्यांच्या उत्कृष्ट कामिगीरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर व जिल्हा अग्रणी बँक, धाराशिव यांनाही जिल्हास्तरीय लक्ष्यपूर्ती केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

=======================================================================================

पीएफआरडीएचे  उप महाप्रबंधक रुबी भावसार यांनी अटल पेन्शन योजनेविषयी सखोल माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने १८ ते ४० वयोगटातील या योजनेसाठी पात्र असणारा भारतीय नागरिक त्याच्या वयाच्या ६० वर्षानंतर त्याच्या कुटुंबासाठी १ हजार रुपये ते ५ हजार रुपयापर्यंत कशाप्रकारे एक वाढीव उत्पन्न मिळवून देणारा सदस्य असू शकतो, याबद्दल सविस्तर माहिती दिली. अटल पेन्शन योजना ही खातेदाराच्या मृत्युनंतर, त्यांच्या पती अथवा पत्नी यांना सुद्धा मिळू शकते अशी माहिती दिली.  या योजनेबाबत उपस्थितांचे शंका निरसनही केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीचे  उप महाप्रबंधक दिपक पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.   या कार्यक्रमास बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक चंद्रशेखर मंत्री, आंचलिक प्रबंधक दिगंबर महाडिक, आंचलिक प्रबंधक संजीव कुमार, डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उमेदचे सचिन चवरे, माविमचे सोमनाथ लामगुंडे, आरसेडी संचालक दिपक वाडेवाले आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची सांगता जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम वाखरडे यांनी केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  राज्यस्तरीय बँकर्स समितीचे  इम्तियाज अली, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी श्रीराम साठे यांनी परिश्रम घेतले.  या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, धाराशिव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *