श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ‘ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा देण्याची घोषणा
By assal solapuri||
सोलापूर : संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेले श्री क्षेत्र अरणचा तीर्थक्षेत्र म्हणून पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. परंतु, या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तयार केला जात आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. परंतु, या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातील १०० कोटीचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून, या तीर्थक्षेत्राला “अ” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्रीक्षेत्र अरण (ता. माढा) येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा व भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार राम शिंदे, जयकुमार गोरे, राम सातपुते, योगेश टिळेकर, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम कांडगे, बळीराम शिरसकर, संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, महामंडलेश्वर मनिषानंद महाराज यांच्यासह सावता महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
========================================================================================================
उपमुख्यमंत्री फडवणीस पुढे म्हणाले की, संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला. समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य केले. आपल्या कर्मात मग्न असलेल्या सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठूरायाची पालखी अरण येथे येते. ही घटना खूप महत्त्वाची आहे. १२९५ मध्ये अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
आजच्या समाजालाही संतांच्या विचारांची नितांत गरज आहे. आपल्या राज्यातील समाज जाती-जातीमध्ये विखंडित होत आहे. मताच्या राज कारणामुळे समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. सर्वांना सोबत घेऊन एकसंघ समाज निर्माण करण्याचे जी संतपरंपरेची विचारसरणी होती ती विचारसरणी अंगीकरणाची गरज आहे, त्यातूनच एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकेल, असे मत उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्यासाठी संत शिरोमणी सावता महाराजांचे मराठीत लिहिलेले अभंग महत्वपूर्ण पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथील भिडे वाडा केस राज्य शासनाने जिंकलेली असून या वाड्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. राज्य शासनाने विविध शासकीय योजना महिला व मुलीसाठी सुरू केलेल्या आहेत. उच्च शिक्षणात क्रांतिकारी निर्णय घेतला असून मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे. इतर मागासवर्ग विभागाला भरघोस निधी उपलब्ध करून देऊन या अंतर्गत येणाऱ्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
======================================================================================================
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला. आपलं कर्तव्य व कर्म करत रहावे ही शिकवण सावता महाराजांनी दिली. अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगून संत शिरोमणी सावता महाराज वास्तुशिल्प आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. लवकरच या भागाचा विकास होऊन भक्तांना येथे चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयात भिडे वाड्याचा निकाल राज्य शासनाच्या बाजूने लागला असून, दि. १५ ऑगस्ट २०२४ नंतर २०० कोटीच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन प्रधान मंत्री यांच्या हस्ते करण्याचा मानस भुजबळ यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून दिलेला आहे शासनाचा हा निर्णय म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेच काम शासन नेटाने पुढे नेत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य शासन लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीला मोफत वीज, मागेल त्याला सौर पंप, तीन सिलेंडर मोफत योजना, मुख्यमंत्री तीर्थटन योजना अशा योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
========================================================================================================
गृहनिर्माण व इतर मागास विभागाचे मंत्री अतुल सावे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून अरण हे संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असून या भूमीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे गृहनिर्माण व इतर मागास विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. अरण इथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास चार कोटीचे विविध विकासात्मक कामे झालेली आहेत. हे “ब” वर्गाचे तीर्थक्षेत्र असून राज्यातील इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे जलद गतीने विकास होण्यासाठी अरण ला ‘अ’वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे केली. इतर मागास विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी ७ हजार ८०० कोटीचा निधी मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, आमदार योगेश टिळेकर, आमदार राम शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
======================================================================================================
पुस्तक प्रकाशन
संत शिरोमणी सावता महाराज यांच्यावर आधारित असलेले “संत सावता माळी अभंग व विचार” या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाले. या पुस्तिकेच्या लेखिका प्रा. सुवर्णा चव्हाण गुंड या आहेत.
======================================================================================================
संत सावता महाराज भक्तनिवास वास्तू शिल्प कामाचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत सावता महाराज भक्त परिवार मेळावा कार्यक्रमाचा शुभारंभ व विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रभू महाराज माळी यांनी ट्रस्टच्यावतीने श्री क्षेत्र अरण येथे भाविक, वारकरी यांच्यासाठी देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. राज्यातील इतर तीर्थक्षेत्राच्या मानाने पारं तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने उपेक्षित असल्याचे सांगून या तीर्थक्षेत्र विकासासाठी भरून निधी शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.