विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 17 जुलैपर्यंत करा अर्ज
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 17 जुलै 2023 पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी गुरूवारी दिली.
सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन केले आहे. विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना 17 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे. पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएससी फिजिक्स – अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी आणि एमएससी इलेक्ट्रॉनिक्स करिता 25 जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. याच दिवशी विद्यापीठ संकुलातील एमएससी मायक्रोबायोलॉजी तसेच संलग्न महाविद्यालयातील एमएससी मायक्रोबायोलॉजी, फिजिक्स (सॉलिड स्टेट) अँड फिजिक्स (नॅनो फिजिक्स), एमएससी इलेक्ट्रॉनिक्स, एमएससी बॉटनी, एमए/ एमएससी या अभ्यासक्रमांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे.
26 जुलै 2023 रोजी सोलापूर विद्यापीठ संकुलातील एमएससी केमिस्ट्रीच्या पॉलिमर, ऑरगॅनिक, इंडस्ट्रियल, मेडिसिनल केमिस्ट्री, एमएससी इन्व्हरमेंटल सायन्स, एमएससी स्टॅटिस्टिकस, एमएससी बायोस्टॅटिस्टिकस, एमए मास कम्युनिकेशन तसेच संलग्न महाविद्यालयातील एमएससी केमिस्ट्री ऑरगॅनिक, इनऑरगॅनिक, फिजिकल, ऍनालीटीकल, फार्मास्युटिकल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे. 27 जुलै 2023 रोजी विद्यापीठ संकुलातील एमएससी कम्प्युटर सायन्स, एमएससी मॅथेमॅटिक्स तसेच महाविद्यालयातील एमएससी कम्प्युटर सायन्स, एमएससी झूलॉजी, मॅथेमॅटिक्स, एमएससी ऍग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. 28 जुलै 2023 रोजी विद्यापीठ संकुलातील एमएससी बायोटेक्नॉलॉजी, एमएससी बायोइन्फॉर्मेटिक्स, महाविद्यालयातील एमएससी बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, बायोइन्फॉर्मेटिक्स आणि एलएलएम अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. विद्यापीठ संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रकानुसार प्रवेशपूर्व परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.