राज्यातील राजकारणात पुन्हा भुकंप
मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासह राष्ट्रवादीतील 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भुकंप झाल्याचे पहावयाला मिळत आहे.
शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो आहे. आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या नावाने आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार आहे. तसेच भाजपसोबत जाण्याबाबत आमच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर त्याला मूर्त स्वरुप आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेला जातीयवादी म्हणून संबोधलं जात होते. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि आम्ही गेलो. ज्या पक्षाला जातीयवादी म्हटले जाते त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो तर मग भाजपसोबत जाण्यात काय अडचण आहे ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. आम्ही नागालँडमध्ये भाजपसोबत गेलो आहोत. मग महाराष्ट्रात विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत का जाऊ शकत नाही ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आज काही जण पोहोचू शकले नाहीत. काहीजण परदेशात आहे. विशेषत: मी लोकप्रतिनिधींविषयी बोलतो. त्यांच्याशी मी संपर्क साधलाय. त्यांनी मान्यता दिली आहे. काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आमच्यासोबत जास्तीत जास्त आमदार आणि खासदार आहेत, असा दावाही त्यांनी केला.
अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी घेतली मंत्री पदाची शपथ.