– वसुंधरा महाविद्यालयात “केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ समजून घेताना” या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी प्रतिपादन
सोलापूर : प्रतिनिधी
सरकारचे राजकोषीय धोरण आणि धोरणाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील तरतुदी महत्त्वाच्या ठरतात. अर्थसंकल्पाच्या उद्दिष्टात प्रामुख्याने आर्थिक, सामाजिक, राजकीय, संस्कृतिक आणि पर्यावरणीय उद्दिष्टांचा समावेश दिसून येतो. प्रत्येक सरकार या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या महत्त्वानुसार तरतुदी करताना दिसते. अर्थात, सरकारची अधिकची तरतूद ही सार्वजनिक कर्जावरील व्याज परताव्यासाठीच करावी लागते. देशाचे संरक्षण, अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था या बाबी अर्थसंकल्पात प्रधान्याने विचारात घेताना कृषी, उद्योग, व्यापार, ग्रामीण विकास, वित्तीय क्षेत्र, कल्याणकारी योजना, अन्न सुरक्षा, रोजगार वृद्धिंच्या योजना इत्यादीबाबत अर्थसंकल्पाची फलनिष्पत्ती महत्त्वाची ठरते, असे मत व्याख्याते प्रा. डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी मांडले.
वसुंधरा कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ समजून घेताना” या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्याख्याते प्रा. डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने विद्यार्थी व प्राध्यापक यांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय आढाव्यात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीना गायकवाड यांनी अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीतून देशातील सर्वसामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणता आले पाहिजे, तरच देशाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी केले. परिचय प्रा. डॉ. तानाजी देशमुख यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ. संगीता भोसले यांनी केले. आभार डॉ. किशोर जोगदंड यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.