मध्य रेल्वेकडून २५७  किलोमीटरचे दुहेरीकरण आणि मल्टी ट्रॅकिंगचा विक्रम

Central Railway

सोलापूर : प्रतिनिधी

मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ग्राहक आणि प्रवाशांच्या प्रवासी सोयी असो की सुविधा, नवीन लाईन, विद्युतीकरण किंवा दुहेरीकरण अशा विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेकडून २५७  किलोमीटरचे दुहेरीकरण आणि मल्टी ट्रॅकिंगचा विक्रम पूर्ण केला आहे.

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३  या कालावधीत आतापर्यंत मध्य रेल्वेने २५७  किलोमीटरचे दुहेरीकरण आणि मल्टी ट्रॅकिंगचा विक्रम पूर्ण केला आहे. यामध्ये नरखेड – कळंभा (१५.६ किमी), जळगाव-सिरसोली (11.35 किमी), सिरसोली-महेजी (२१.५४ किमी), माहेजी – पाचोरा तिसरी लाईन (१४.७० किमी), अंकाई किल्ला – मनमाड (८.६३ किमी), राजेवाडी – जेजुरी – दौंडज (२०.०१ किमी), काष्टी – बेलवंडी (२४.८८ किमी), वाल्हा – निरा (१०.१७ किमी), कळंभा – काटोल (१०.०५ किमी), जळगाव – भादली (११.५१ किमी), कान्हेगाव – कोपरगाव (१५.३७ किमी), सातारा – कोरेगाव (१०.९० किमी), भिगवण – वाशिंबे (२९.२० किमी), बेलापूर – पुणतांबा (१९.९८ किमी), भादली – भुसावळ (१२.६२ किमी) इत्यादी. त्याव्यतिरिक्त बेलापूर – सीवूड्स – उरण नवीन मार्ग प्रकल्पाची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केली आहे.

             

२०२१-२२ मध्ये मध्य रेल्वेने एकूण १७७.११ किमीची तत्कालीन सर्वोच्च पायाभूत सुविधा संवर्धन पूर्ण केले. ज्यात नवीन लाईन (३१ किमी), दुहेरीकरण (७४.७९ किमी), तिसरी/चौथी लाईन (५३.३२किमी) आणि ५वी/६वी मार्गिका (१८ किमी म्हणजे ९ किमीची प्रत्येक लाईन) समाविष्ट आहेत. तसेच ३३९ रूट किमी (मार्ग किमी) चे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अलीकडेच मध्य रेल्वेने भारतीय रेल्वेच्या 100 टक्के मिशन विद्युतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करून सर्व ब्रॉडगेज मार्गांवर (3 हजार 825 मार्ग किलोमीटर) 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य केले आहे.

क्षमता वाढल्याने मध्य रेल्वेला वाहतूक कोंडीवर मात करण्यात मदत होईल. ट्रेन सुरळीत चालण्यास मदत होईल. संरक्षेवर तसेच प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करून आम्ही रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्याचे आणि रेल्वेचे नेटवर्क भविष्याकरीता तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नरेश लालवानी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *