विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर फोडली मटकी

– पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास १ लाख घागरी मोर्चा काढण्याचा आनंद चंदनशिवे यांचा इशारा

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली मटकी फोडून मोर्चा काढण्यात आला. योवळी पाणी द्या, पाणी द्या, सोलापूर शहराला पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा  देण्यात आल्या.

यावेळी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग, सोलापूरचे विद्युत अधिकारी, पुणे विभागातील विद्युत विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांचा समन्वय करून सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी या कमिटीच्या माध्यमातून करण्यात यावी. तसेच उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीचे काम तातडीने हाती घेणे  काळाची गरज आहे. परंतु सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर समन्वय नसल्यामुळे सातत्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.

शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय गंभीर आहे. तातडीने या विषया संदर्भात  उच्चस्तरीय बैठक लावून हा विषय मार्गी लावावा. याबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांना माजी नगरसेवक तथा गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

तरी शहराचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा. अन्यथा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास १ लाख घागरी मोर्चा जनतेच्या हितासाठी काढणार असल्याचा इशारा आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.

या आंदोलनावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत आप्पा जाधव, सुहास सावंत, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, ह्रुदयनाथ मोकाशी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *