सोलापूर : प्रतिनिधी
रसायन क्षेत्रातील नावाजलेली कंपनी बालाजी अमाईन्सने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्याकडून ‘कंपनी ऑफ द इयर’ या पुरस्काराने बालाजी अमाईन्सला गौरविण्यात आले.
दिल्ली येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये 27 जुलै रोजी पार पडलेल्या समारंभात भारत सरकारच्या रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते बालाजी अमाईन्सचे सह-व्यवस्थापकिय संचालक एन. राजेश्वर रेड्डी यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी बोलताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, फिक्की ही भारतातील सर्वात मोठी आणि जुनी संस्था असून भारतीय उद्योग, धोरण आणि आंतराष्ट्रीय व्यावसायिक समुदायासाठीचे व्यासपीठ आहे. दरवर्षी फिक्कीकडून भारतीय रसायन उद्योगात विशेष योगदान दिलेल्या कंपन्यांची श्रेणीनिहाय पद्धतीने निवड करुन पुरस्कार देण्यात येतो. बालाजी अमाईन्सची निवड ज्या श्रेणीमध्ये करण्यात आली. त्यासोबत रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल लि., घरडा केमिकल्स आणि जीवन केमिकल्स या कंपन्यांचासुध्दा समावेश आहे. हा पुरस्कार म्हणजे बालाजी अमाईन्सच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रतिक असून अभिमानास्पद बाब आहे. याचे श्रेय त्यांनी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना दिले. या पुरस्काराने बालाजी अमाईन्सला पुढील झेप घेण्यासाठी नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले केले.