-उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे

सोलापूर : प्रतिनिधी
गेली आठ वर्षे लातूरमध्ये काम केले आहे. तेथील कामाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातही लातूर पॅटर्न राबवण्यासाठी प्रयत्न करणार, असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबतचा आदेश मंगळवारी जारी केला होता. बुधवारी अंधारे यांनी पदभार स्विकारला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निपटारा करण्यावर भर राहील, पे युनिटच्या कामांमध्ये तत्परता राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पदभार घेताच माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अंधारे यांचा सत्कार केला. तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची बदली झाल्यानंतर त्यांचा चार्ज सुलभा वटारे यांना देण्यात आला होता. परंतु तीन महिन्यांनी तोच पदभार महीला व बालकल्याणचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांना मिळाला. शेख यांचीही नुकतीच बदली झाल्याने तो चार्ज उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे.