
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबतचा आदेश मंगळवारी जारी केला.
माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार यापूर्वी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख यांच्याकडे होता. मात्र त्यांची बदली लातूर जिल्हा परिषदेमध्ये झाल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी पद रिक्त होते. जवळपास 10 दिवस या पदाचा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी कोणालाही दिला नव्हता. यासाठी अनेक अधिकाऱी इच्छुकांच्या रांगेत होते.
दरम्यान माध्यमिक उपशिक्षणाधिकारी पदावर तृप्ती अंधारे आणि नळे हे दोन नवीन अधिकारी आले. अखेर शिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेण्यात तृप्ती अंधारे यांनी बाजी मारली. मंगळवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी अंधारे यांच्या नावाचा आदेश काढला. यामध्ये त्यांनी या रिक्त पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात अंधारे यांच्याकडे देण्यात येत असून पुढील आदेश येईपर्यंत अथवा नियमित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हजर होईपर्यंत सोपविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.