११ हजार ८८१ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रकांचे वाटप

विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विचार आणि उद्योजकतेचा स्वीकार करावा;

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या पदवीप्रदान समारंभात पदवीप्रदान समारंभात ११ हजार ८८१  स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे, १६२ स्नातकांना पीएचडी आणि ५७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ४४ विद्यार्थिनींनी सुवर्ण पदक पटकावली आहेत.

आजच्या जगात यशासाठी तांत्रिक ज्ञानासोबतच संवाद कौशल्ये, डिजिटल आणि एआय साक्षरता, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सांघिक कार्य, नेतृत्व आणि मजबूत नैतिक मूल्येदेखील तितकीच महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. विद्यार्थ्यांनी नेहमी जिज्ञासू राहावे, स्वतंत्रपणे विचार करावा, उद्योजकतेचा स्वीकार करावा आणि आयुष्यभर ज्ञान संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू लक्ष्मीकांत दामा आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना मानद ‘डी. एस्सी.’ आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे यांना मानद ‘डी. लिट.’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

सुवर्णपदक विजेत्यामध्ये विद्यार्थिनींचा सर्वाधिक समावेश असल्याबद्दल आनंद व्यक्त करतांना राज्यपाल वर्मा म्हणाले, शिक्षणातील मुलींचे यश देशातील तरुण महिलांचा वाढता आत्मविश्वास आणि आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. आजन्म शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली असून, शिकणे कधीही थांबवू नका. सचोटीशी कधीही तडजोड करू नका आणि स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग नेहमी समाजाच्या सेवेसाठी करावा, असा संदेशही राज्यपालांनी विद्यार्थ्यांना दिला.

राज्यपाल पुढे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ए.आय., मशीन लर्निंग, जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स, सायबर सुरक्षा, फूड टेक्नॉलॉजी आणि शिकाऊ उमेदवारीवर आधारित शिक्षणाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात ही तंत्रज्ञाने आणि वैज्ञानिक नवकल्पना या जगाला अभूतपूर्व वेगाने बदलत आहेत. विद्यापीठाने सुरू केलेले हे उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकऱ्या आणि संधींसाठी निश्चितच तयार करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच विद्यापीठाने एनआयआरएफ क्रमवारीमध्ये उच्च स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

तंत्रज्ञान आपले जीवन सुधारू शकते, परंतु सहानुभूती आणि करुणेविना तंत्रज्ञानाला अर्थ नाही. हे लक्षात घेत नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असताना नेहमी मानवता जपावी, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यापीठे केवळ पदव्या देण्यापर्यंत मर्यादित न राहता ती ज्ञान, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता आणि राष्ट्र उभारणीची केंद्रे बनली पाहिजेत. त्यांनी तरुणांना बदलांशी जुळवून घेण्यासह बदलांचे नेतृत्व करण्यासाठीदेखील तयार केले पाहिजे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. विद्यापीठांनी न्याय, समानता, सर्वसमावेशकता, पर्यावरणीय जबाबदारी आणि समाजसेवेला चालना दिली पाहिजे असे वर्मा म्हणाले.

  • दीक्षांत भाषणात माजी खासदार डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, तंत्रज्ञान विलक्षण वेगाने आपल्या जीवनशैलीवर प्रभाव टाकत आहे. अशा स्थितीत अध्ययन आणि अध्यापन पद्धतीत काही बदल घडवून आणणे क्रमप्राप्त आहे. आपली अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही तक्षशिला आणि नालंदाच्या काळापासून गुरु-शिष्य संबंधांचे अधिष्ठान ठेवून विकसित झाली आहे आणि त्यातही जीवनानुभवांच्या आधारे शिक्षणावर भर दिला गेला होता. त्यामुळे आजच्या शिक्षणात अनुभव केंद्रित अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. विद्यापीठांनी आपली पूर्वीच्या रोजगार नोंदणी केंद्रांना ‘रोजगार आकांक्षा केंद्रे’ या स्वरूपात विकसित करून सक्तीची आणि सशुल्क बेरोजगार नोंदणी सर्वदूर करायला हवी. आपल्या लगतच्या राष्ट्रांच्या भाषांचे शिक्षण देण्याचीही व्यवस्था व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करून विद्यापीठाच्या उपक्रमांची व यशाची माहिती दिली. आजच्या काळाशी सुसंगत वैज्ञानिक, तांत्रिक अभ्यासक्रम सुरू केल्याचे ते म्हणाले. यावेळी विद्यापीठाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत मिरवणूकीने झाली. तत्पूर्वी विद्यापीठाच्या उद्यम इन्क्यूबेशन सेंटरमार्फत आयोजित  स्टार्टअप प्रदर्शनाचे उद्घाटन व पाहणी राज्यपालांनी केली.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *