कार्तिकेयन एस. यांनी स्वीकारला सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या दि. 2 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती झाली आहे.

- कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. सोलापूरला बदली होण्यापूर्वी ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. कार्तिकेयन एस. हे मूळचे तामिळनाडू राज्याचे रहिवासी आहेत. त्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे.
- महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

- नाशिक येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (ITDP) प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी आदिवासी क्षेत्रातील विकासासाठी काम केले. कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेत (PMC) अतिरिक्त आयुक्त म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिथे त्यांनी पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी समस्यांवर काम केले.
- कोल्हापूर जिल्हा परिषदेत आल्यापासून त्यांनी जलजीवन मिशन, ग्रामीण रस्ते आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी डिजिटल प्रणालीचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे.
- शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते थेट ग्रामीण भागाचा दौरा करून लोकांशी संवाद साधण्याला प्राधान्य देतात. त्यांनी समृद्ध शाळा आणि आदर्श phc अभियान यशस्वी केले.
