प्रशिक्षिका अर्चना कापरे यांचे आवाहन: इमिटेशन ज्वेलरी (फॅशन) प्रशिक्षण उपक्रम
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सध्याच्या फॅशनच्या दुनियेत दर तीन महिन्याला नवनवीन फॅशनचा उदय होत आहे. अशावेळी जेंव्हा आपण स्वतः हाताने इमिटेशन, फॅशनेबल ज्वेलरी तयार करतो, तेव्हा त्या वस्तूंना फार किंमत असते. सध्या जरी मशीनचा जमाना असला तरी अद्यापही हँडमेडला मूल्य अधिकच आहे. म्हणून एकमेकींना सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत अर्थात इमिटेशन, फॅशनेबल ज्वेलरीच्या माध्यमातून कमवायच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचं सोनं करू यात, असे आवाहन कल्पना दिव्यांग महिला उद्यमिता समूह पुण्याच्या प्रशिक्षिका अर्चना कापरे यांनी केले आहे.

सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन संचलित, ‘पद्मशाली सखी संघम’, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि कल्पना दिव्यांग महिला उद्यमिता समूह (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सोलापुरात पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात इमिटेशन ज्वेलरी (फॅशन) प्रशिक्षण उपक्रम पार पडले. त्यावेळी अर्चना कापरे बोलत होत्या. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, वाचनालयाचे उपाध्यक्ष देविदास गोटीपामूल, ‘एसबीसी’चे राज्य निमंत्रक अशोक इंदापुरे, वाचनालयाच्या पदाधिकारी शैलजा अन्नलदास, अर्चना साबळे, अश्विनी चव्हाण, सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम उपस्थित होते.

अर्चना कापरे म्हणाल्या, मराठीत म्हण आहे, एकमेकां सहाय्य करुं, अवघें धरु सुपंथ! सुपंथ तर, होणारच आहोत. आता यापुढे असे म्हणुया, ‘एकमेकींना सहाय्य करत आणि अवघें होऊ श्रीमंत’.! कापरे यांच्या आवाहनामुळे प्रशिक्षणासाठी आलेल्या महिला व मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला होता. ज्वेलरीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या समाधानी दिसत होत्या. दिड्डी, कारमपुरी व इंदापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सखी संघमच्या माजी अध्यक्षा, सल्लागार ममता मुदगुंडी यांनी केले. यावेळी वनिता सुर्रम, पल्लवी संगा, मयुरा पोतदार, सुप्रिया मासम, अर्चना दासरी आदी उपस्थित होते.

