‘अंतरिम’नंतर होणार संचमान्यता

सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता सुरु झाली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार प्रमाणीकरण व आधार दुरुस्ती केलेल्या शाळांची संचमान्यता थेट अंतिम केली जात आहे. परंतु ८८ टक्क्यांपेक्षा जास्त आधार प्रमाणीकरण झाले, अशा शाळांची संचमान्यता अंतरिम केली जात असून १०० टक्के काम झाल्यावर अंतिम होणार आहे. संचमान्यता अंतिम झाल्यानंतरच राज्यात जून-जुलैमध्ये शिक्षक भरती (Recruitment of teachers in the state in June-July)) होईल.
राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी अजूनही आधारकार्ड संबंधित शाळेत दिलेले नाही. दुसरीकडे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या ‘आधार’मध्ये त्रुटी आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना १५ मेपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर मुदतवाढ दिलेली नाही. सध्या उन्हाळा सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्याने साधारणतः ३० जूनपर्यंत मुदत दिली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, संबंधित शाळांना त्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व आधारमधील दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. संचमान्यता पूर्ण झाल्यानंतरच शिक्षकांची ५० टक्के रिक्तपदे (अंदाजे ३२ हजार) भरली जाणार आहेत. त्यातही सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळांमधील रिक्तपदे भरली जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक भरती मेरिट यादीनुसार होणार असून त्यासाठी एका पदाला एकच उमेदवार दिला जाणार आहे. तर खासगी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी एका पदासाठी दहा उमेदवारांची मुलाखत होऊन त्यातून एकाची निवड केली जाणार आहे. 12 टक्के विद्यार्थ्यांकडे अजूनही ‘आधार’ नाही. राज्यातील सर्वच शाळांमध्ये 2 कोटी 8 लाख विद्यार्थी आहेत. यंदाच्या संचमान्यतेसाठी आधारकार्ड व तेही अचूक आधार असलेल्याच विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरली जात आहे. त्यामुळे आता दीड महिन्यात संबंधित शाळांना त्यांच्याकडील सर्वच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मिळवावे लागणार आहे. एखाद्या शाळेतील ३० विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास तेथील एक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे. ही कारवाई अटळ आहे. अजूनही १२ टक्के म्हणजेच अडीच ते तीन लाख विद्यार्थ्यांनी आधारकार्ड शाळांमध्ये जमा केलेले नाही. त्यांना आता अंदाजे दीड महिन्यांचीच (३० जूनपर्यंत) मुदत असणार आहे.
आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड काढून घ्या, आधारमधील चुकीची दुरुस्ती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना सुरवातीला ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. तांत्रिक अडचणींमुळे त्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजूनही बऱ्याच शाळांचे काम १०० टक्के झालेले नाही. त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने ८० ते ९९ टक्के काम झालेल्या शाळांची संचमान्यता सुरवातीला अंतरिम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शाळांनी १०० टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर संचमान्यता अंतिम करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
55 हजार शिक्षक भरती झालीच पाहिजे
शासन अगोदरच संच मान्यता करून घेऊन विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड व्हॅलिड करून घेऊनच परीक्षा घ्यायला हवी होती. परंतु एवढ्या घाई गडबडीत परीक्षा घेऊन काय साध्य केले आहे. मार्च महिन्यात शिक्षक भरती पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. परंतु आता उशीर होत आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केले पाहिजे, नाहीतर याचा परिणाम संचमान्यतेवर, पटसंख्येवर होवून शिक्षक अतिरिक्त होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे शिक्षक भरती रखडली जाईल. लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून शिक्षक भरती केलीच पाहिजे. नाहीतर भविष्यात शासनाच्या विरोध तीव्र आंदोलन केले जाईल. प्रशांत शिरगूर, सहसचिव, डी. एड., बी. एड., स्टुडन्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य