शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटीबद्ध :  रामदास आठवले

कृषी विज्ञान केंद्र येथे किसान सन्मान सोहळा; पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राथमिकता देत आहे. महिला शेतकऱ्यांची उपस्थिती त्यांचे अधिक योगदान असल्याचे दर्शवते, असे प्रतिपादन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आयोजित किसान सन्मान समारोह कार्यक्रमांमध्ये बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे, राजाभाऊ सरवदे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे उपस्थित होते.

सन्मान निधीच्या एकोणिसाव्या हप्त्याचे वाटप पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. सोलापूर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी कै. ज्योतीराम गायकवाड यांच्या प्रयत्नातून हे कृषी विज्ञान केंद्र उभे आहे, ते शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती देत आहेत. सध्या शेतीमध्ये खर्च कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे यासाठी सेंद्रिय शेतीची वाट धरावी लागेल, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मान्यवरांसह कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या माजी प्रशिक्षणार्थीनी उत्पादित केलेले सेंद्रिय अंजीर, हुरडा, श्रीखंड, जात्यावर केलेली तूरदाळ, ज्वारीचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, नाचणीची बिस्किटे इत्यादींची पाहणी केली.  महिला शेतकरी उत्पादक कंपनी बोरामणी, सेंद्रिय नुट्रीशनल मॉल याबद्दल सखोल माहिती घेतली.

प्रास्ताविकामध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांनी किसान सन्मान निधी योजनेविषयी सविस्तर अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तसेच कार्यक्रमाच्या आयोजना मागील हेतू स्पष्ट केला.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी डाळिंब लागवडीविषयी सविस्तर माहिती दिली. नैसर्गिक शेती व सेंद्रिय निविष्ठांचा वापर याविषयी सेंद्रिय शेती करणारी शेतकरी उमेश श्रीधर देशमुख (काळेगाव, ता. बार्शी) अजित ओक (हत्तुर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी आपले अनुभव कथन केले. अंतिम सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भागलपूर बिहार येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संभाषणाचे आयोजन करण्यात आले.सूत्रसंचालन विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप गोंजारी यांनी केले.

कार्यक्रमासाठी काळेगाव सुरडी, दहिटणे, ढोराळे, पिंपरी ( ता. बार्शी),  वांगी, हत्तूर, कंदलगाव, बोरामणी ( ता. दक्षिण सोलापूर), चुंगी, मोट्याळ, बोरगाव, साफळे, काजीकणबस, किणीवाडी (ता. अक्कलकोट) येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *