जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले: अर्थसहाय्य निधीसाठी आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : कृषी विभागाच्या सन- २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य निधी अप्राप्त असलेल्या खातेदारांनी दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषि विभागाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
सन -२०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत ५ हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मयदित देण्यात येत आहे. यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या सातबारा उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, असे खरीप २०२३ कापूस सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत.
पात्र शेतकऱ्यांनी ई पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्बायाबत खातरजमा www.scagridbt.mahalt.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषी सहाय्यक यांचेकडून करुन घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही. तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या सातबारा उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे. अशा शेतक-यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांनी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध आहेत/ विहीत मुदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी नजिकच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.