सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करा

सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांचे आवाहन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  :  सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२४  या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी पात्रतेच्या कालावधी हा दि.१ जानेवारी  २०२३ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ असा विचारात घेतला जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणारे पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ५१ समाजसेवक व्यक्ती व १० संस्थांना देण्यात येतो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार २५ समाजसेवक व्यक्ती व ६ संस्थांना देण्यात येतो.पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार १ व्यक्ती व १ संस्था यांना देण्यात येतो. संत रविदास पुरस्कार १ व्यक्ती व १ संस्था यांना देण्यात येतो. शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक हा मानाचा पुरस्कार ६ महसूल विभागातील प्रत्येकी २ याप्रमाणे १२ संस्थांना देण्यात येतो, प्रत्येकी रुपये ७.५० लक्ष, सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार हा ६ महसूल विभागातील प्रत्येकी ३ (प्रथम,द्वितीय, तृतीय) याप्रमाणे १८ संस्थांना देण्यात येतो. हा पुरस्कार राज्यस्तरीय असून,  प्रथम ५ लाख, द्वितीय २ लाख तसेच उत्कृष्ट ठरलेल्या संस्थेस १ लाख रुपये देण्यात येणार आहे.

सदर पुरस्कारांसाठी व्यक्तींकरिता वयाची अट पुरूषांसाठी ५० वर्षे असून, महिलांसाठी ४० वर्षे आहे. संस्थेने समाज कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे उल्लेखनीय कार्य कलेले असावे. संबंधित संस्थेविरूध्द किंवा व्यक्ती विरूध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.

समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी सदर पुरस्कारासाठी दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत परिपुर्ण अर्ज भरुन व अर्जामध्ये नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रासह प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथे सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण  सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *