काम न करता पगार अन बदलीसाठी घेतले पैसे

– भारत (आबा) शिंदेंची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

सोलापूर : प्रतिनिधी

जि. प. आरोग्य विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने संघटनेच्या नावाखाली बेकायदेशीर कामे करून काम न करता पगार घेतला आहे, तसेच तालुक्यातील दोन महिला कर्मचाऱ्यांची अंतरजिल्हा बदलीसाठी अनुक्रमे ५० व ८० हजार रूपये घेतल्याचे समजते, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत (आबा) शिंदे यांनी केला असून या तक्रारीचे निवेदन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले आहे.

      तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, श्रीमती शमा पठाण उर्फ सुप्रिया जगताप या आरोग्यसेविका या पदावर प्रा. आ. केंद्र महाळुंग येथे कार्यरत आहेत. माहे मार्च पासून माहिती घेतली असता त्या संघटनेच्या कामासाठी म्हणून सतत जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या परिसरात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फिरताना दिसतात. मार्चमध्ये ६ दिवस, एप्रिलमध्ये ४ दिवस, मेमध्ये ५ दिवस, जूनमध्ये २ दिवस, जुलैमध्ये २ दिवस, ऑगस्टमध्ये ९ दिवस त्या जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा परिषद परिसरात असल्याचे निदर्शनास आले आहे. या दिवशी शासनाचे काहीही काम न करता त्यांनी पगार घेतला आहे. तरी याची सखोल चौकशी करावी.

            तसेच अधिक माहिती घेतली असता त्यांनी तालुक्यातील दोन महिला कर्मचाऱ्यांची अंतरजिल्हा बदली करण्यासाठी एका महिलेकडून ५० हजार तर दुसऱ्या महिलेकडून ८० हजार रूपये अशी रक्कम घेतल्याचे समजते, तरी याची सखोल चौकशी करावी.

            श्रीमती जगताप उर्फ पठाण या मुख्यालयी राहत नाहीत. नियमित गृहभेटी देत नाहीत. फिरती करत नाहीत व फिरती भत्ता उचलतात. सहकार्ऱ्यांशी सतत भांडण करतात. वैद्यकिय अधिकारी यांच्याशी उध्दट वर्तवणूक करतात. जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पिंपळे, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे माझ्या घरी येतात तसेच अनेक राजकीय पुढाऱ्यांची नावे घेऊन त्यांची माझी ओळख आहे. तुमचे विरुध्द मी कारवाई करीन, कुणीही माझ्या नादी लागू नका, अशी अरेरावीची भाषा करुन काम करण्याचे टाळतात.

            लसीकरण करणे हे त्यांचे प्रमुख काम असताना, माझे वय झाले आहे असे सांगून मुळ काम जमत नाही म्हणून राष्ट्रीय कामापासून पळ काढतात. त्यांना ५४ वर्षे पूर्ण झालेमुळे त्या काम करण्यास पात्र आहेत का ? याची खात्री करावी. सोलापूरला आल्यानंतर डॉ. पिंपळे यांचे नाव सांगून प्रशिक्षणासाठी मागविलेल्या मध्यान्न भोजनावर दमदाटी करून एथेच्छ ताव मारतात. प्रशिक्षणाचे प्रमुख यांच्याशी वाद घालतात. कार्यालयात संबंधित आस्थापणेकडे असलेल्या कागदपत्राची दमदाटी करून मागणी करतात.

या बाबींची जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी व गोपनीय चौकशी करून नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत (आबा) शिंदे यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *