सोलापूर जिल्हा वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

२० वकिलांच्या संघांनी नोंदवला सहभाग;  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ च्या निमित्ताने  आयोजित जिल्हास्तरीय वकिलांच्या  टेनिस बॉल क्रिकेट स्पधेला सुरुवात झाली . या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुके आणि सोलापूर शहरातून एकूण वीस वकिलांच्या क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन  शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी होते. सुरूवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशांनी करण्यात आले. सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची परंपरा जुनी असल्याचे सांगून दरवर्षी अशाच प्रकारे विविध कला गुणदर्शन आणि खेळांच्या स्पर्धा भरविण्यात येत असून, अशा प्रकारचे  आयोजन वकिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  सलमान आझमी यांच्या हस्ते उपस्थित तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षांचे आणि सहभागी २० संघांच्या कर्णधारांचे स्वागतपर सत्कार करण्यात आले.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे  आझमी यांनी सोलापूर बार असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेच्या उपक्रमाचे आणि एकंदरीत वकिलांच्या हिताच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. वकिलांना त्यांच्या कामामुळे उद्भवणाऱ्या  ताणतणावातून मुक्त होण्यासाठी खेळ हे एकमेव माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष  अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणात ते स्वतः एक टेस्ट लेव्हलचे क्रिकेटर असल्याचे सांगितले. क्रिकेट हा खेळ शारीरिक आरोग्यासाठी अतिशय चांगले असून, यात नेतृत्वगुण आणि समूहाने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. वकिलांसारख्या असोसिएशनमध्येदेखील त्यांच्या व्यस्त जीवनात अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याने सोलापूर बार असोसिएशनचे त्यांनी कौतुक केले आणि सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सोपान शिंदे, मोहोळ क्रिकेट संघाचे कर्णधार ॲड. रमेश पाटील, युनिक ॲडव्होकेट्स क्रिकेट संघाचे कर्णधार ॲड. रियाज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन म्हणजे वकिलांसाठी एक विरंगुळा असून, नेहमीच्या धावपळीच्या जीवनातून त्यांना यातून सुटका मिळत असल्याचे सांगितले.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष न्हावकर, मुंबई हायकोर्टचे विधिज्ञ ॲड. विक्रांत फताटे, एसीपी  माने, चडचणकर ट्रॅव्हल्सचे जगदीश चडचणकर, सोलापूर बार असो अध्यक्ष ॲड. अमित व्ही. आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिवा ॲड. निदा अनिस सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार सि. कटारे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते.   सूत्रसंचालन सचिव ॲड मनोज पामुल, आभार प्रदर्शन ॲड. विनयकुमार कटारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *