अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर; अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त प्रशासनाच्यावतीने नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : केंद्र व राज्य शासन अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. या अनुषंगाने माहे ऑक्टोबर २००९ पासून पंतप्रधानांचा नवीन १५ कलमी कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाची सोलापूर जिल्ह्यात सर्व संबंधित शासकीय विभागामार्फत अत्यंत प्रभावीपणे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासन अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकूर मार्गदर्शन करत होत्या.
जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार संगिता खंडाळे, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, पोलीस उपायुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक शिंदे, उच्चशिक्षण विभागीय सहसंचालक नलिनी टेंभेकर, मौलाना आझाद विकास महामंडळ व्यवस्थापक सी.ए बिराजदार, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रसाद मिरकले, महापालिकेचे महिला बचत गटाचे समन्वयक समीर मुलाणी यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी ठाकूर पुढे म्हणाल्या की, केंद्रशासन अल्पसंख्याक समुदायासाठी १५ कलमी कार्यक्रम राबवत आहे. या योजना राबवत असताना संबंधित समुदायातील नागरिकांना काही अडचणी आल्यास तर संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी तात्काळ समन्वय साधावा व आपले प्रश्न मार्गी लावावेत. सर्व शासकीय यंत्रणा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करत आहे. आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास होण्यासाठी प्रशासन सर्व शासकीय योजनांची माहिती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक व मौलाना आझाद विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायातील अनेक नागरिकांना कर्ज पुरवठा करून व्यवसाय उद्योग उभारणीसाठी सहाय्य करण्यात आलेले आहे. तसेच शिक्षण विभागाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर उच्च शिक्षण विभागामार्फत या समुदायातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आलेले आहे त्यासाठी आवश्यक अर्थसहाय्यही शिष्यवृत्तीच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादिर शेख यांनी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना, घटनात्मक तरतुदी व कायदेशीर बाबी आदींचे सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित शिक्षण, आरोग्य, पोलीस, नियोजन, महिला बालविकास, क्रीडा आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित अल्पसंख्याक समुदायातील मान्यवर नागरिकांनी अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे तसेच सर्व शासकीय योजना राबवताना आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी समाजसेवक काझी उमरानी, मुहम्मद इकरामुद्दीन, मुश्ताक म.इनामदार, नूरअहमद सैफन नदाफ, डॉ. सुभान शेख, महेबुबसाब मुहम्मद हुसेन, इंडियन मुस्लीम इ.हेल्पर इरफान एम. शेख समाजसेवक, रियाज उस्मान मौली आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी प्रतिवर्षी दि.१८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, असे सांगून यानिमित्ताने अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांच्या विविध योजनांची माहिती देण्यात येते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन सहाय्यक नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला यांनी मानले.