ओअॅसिस सोलापूर ओपन एमएसएलटीए – एसडीएलटीए २५ हजार डॉलर महिला आयटीएफ टेनिस स्पर्धा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : २५ हजार डॉलर महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती हिने विजेतेपद संपादन केले.स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूला करंडक व २ लाख ९९ हजार रुपये तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व १ लाख ७४ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व ओअॅसिस, प्रिसीजन, इलिझियम- जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत ओअॅसिस सोलापूर ओपन एमएसएलटीए – एसडीएलटीएच्यावतीने या स्पर्धा एम. एस. एल. टी. ए. टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे पार पडल्या.
या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत भारताच्या पाचव्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती हिने थायलंडच्या बुन्यावी थामचैवतचा ७-५, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना १ तास ४५ मिनिटे चालला. सामन्यात सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर श्रीवल्लीने बुन्यावीची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ७-५ असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये श्रीवल्लीने बुन्यावीला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही व हा सेट ६-३ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
एकेरीतील विजेती श्रीवल्ली भामीडीपतीला ओएसिस रेसिडन्सीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ गांधी व उपविजेती बुन्यावी थामचयवतला इलिझीयम क्लब सोलापूरचे सीएफओ मोहित सिंग यांच्या हस्ते क्रिस्टल चषक प्रदान करण्यात आला. सदरप्रसंगी उत्कृष्ट बॉल पीकरची कामगिरी बजावणाऱ्या शंभूराजे पवार व उज्वल दोडमणी , फिसियोथेरपीचे काम पाहणाऱ्या पुण्याच्या निकिता पाटील, भोजन व्यवस्था साभाळणाऱ्या सुनंदा पवार, वाहतुकीची सोय करणाऱ्या गांधी हुंडाईच्या प्रशांत पाटील यांचा विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंच्या हस्ते भेट देऊन गौरविण्यात आले .याप्रसंगी प्रियदर्शन शहा, केशव रेड्डी, नितीन बिज्जरगी, पराग पाटील, सुजीत भट्टड, सौरव गुप्ता, संदीप देसाई, स्वाती देसाई आदी मान्यवर, खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांनी केले.
- निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: महिला:
- श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती (भारत) [५] वि.वि. बुन्यावी थामचैवत(थायलंड) ७-५, ६-३