अभिनेता सोनू सूदने पुन्हा दाखवली माणुसकी!

सोलापुरातील अपघातग्रस्त अमित शिंदेला दिला आधार

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : काही वर्षांपूर्वी तुळजापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या बलिदान चौक, येथील अमित शिंदे यांना आता आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. कारण या दुर्दैवी अपघातानंतर  त्यांचे दोन्ही पाय निकामे झाले  होती. ते अंथरुणाला खिळून होते. अशा हलाखीच्या परिस्थितीत बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद त्यांच्या मदतीला धावून आले. अमितला चालायला व्हीलचेअरची नितांत गरज होती. ती सोनू सूद यांनी मिळवून दिला.

अमित शिंदे यांच्या डोक्याला खोलवर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत बिकट झाली आहे. कुटुंबाचा एकमेव आधार असल्याने त्यांची परिस्थिती आणखीनच आव्हानात्मक बनली आहे. अमितला चालायला  व्हीलचेअरची नितांत गरज होती. या कठीण काळात त्यांच्या मदतीसाठी सोलापूरच्या सोनू सूद चॅरिटी क्लबचे संस्थापक विपुल मिरजकर पुढे सरसावले. विपुलने स्वत: अमितच्या घरी जाऊन त्याच्या प्रकृतीची पाहणी केली आणि लगेचच अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ते सोनू सूद यांच्याशी संपर्क साधला. सोनू सूद यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी विपुल यांना तात्काळ अमितला व्हीलचेअर देण्याची सूचना केली. या व्हीलचेअरमुळे आता अमितचे दैनंदिन जीवन तर सोपे होणार आहेच, शिवाय त्याच्या कुटुंबालाही दिलासा मिळाला आहे.याशिवाय सोनू सूद यांनी शिंदे कुटुंबीयांशी संवाद साधताना अमितला नोकरी देण्याचीही योजना करू, जेणेकरून कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल असे आश्वासन दिले.

सोनू सूद यांच्या या मदतीमुळे शिंदे कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सोनू सूद हा केवळ मोठ्या पडद्याचा नायक नसून, तो खऱ्या आयुष्यातही माणुसकीचे प्रतीक आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *