सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय ‘अनुवाद कौशल्य’ कार्यशाळा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : आज देशासह संपूर्ण जगभरात विविध भाषा बोलली जाते. भाषा ही ज्या-त्या परिस्थितीला अनुसरून असते. एआय व मशीन लर्निंगच्या युगात देखील भाषा अनुवादाला व्यावसायिक महत्त्व अधिक असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वांग्मय संकुलाच्यावतीने अनुवाद कौशल्य या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर भाषा व वांग्मय संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कमलाकर रुगे यांनी केले.या कार्यशाळेत डॉ. गौतम कांबळे यांनी भाषा व वांग्मय संकुलाविषयी विस्तृत माहिती दिली. राज्यभरातील अध्यापक व संशोधक यात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. आज सोलापुरात अनेक भाषा बोलली जाते. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ही आठ भाषा अभ्यासक्रमासाठी आहेत. भारतात ६४ भाषा आहेत. परदेशी भाषाचे देखील वर्ग विद्यापीठात भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. विशेषतः चायनीज, रशियन, जापनीज भाषेचे वर्ग यामध्ये सुरू करण्यात येईल. भाषा अनुवादासाठी व्यावसायिक महत्त्व असून त्यामध्ये देखील अनेकांना करिअर करता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
- प्राचार्य डॉ. संतोष कोटी म्हणाले की, भाषांतर ही सहज व सुलभ प्रक्रिया आहे. जन्मतः भाव भावनांचे हस्तांतरण होत असते. यातूनच मातृभाषा विकसित होते. वेगवेगळ्या भाषेत सहज संचारासाठी अनुवादाची गरज आहे. आज भाषा व संस्कृतीचे अभ्यास करणारे संशोधक तयार होत आहेत. मशीन ट्रान्सलेशनच्या युगातही भाषा अनुवादकांना देखील महत्त्व आहे. भाषा अनुवादाचे कौशल्य खूप महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.