मुलभूत सोयी सुविधांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध
करून दिल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांनी आभार मानले
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेतून सोलापूर शहरातील असंघटित क्षेत्रातील तब्बल १२०० कामगारांना राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेतर्फे हक्काची घरे मिळण्यासाठीची सोडत प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. २०० सदनिकांसाठी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संगणकीकृत पद्धतीने सोडत काढण्यात आली.
यावेळी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव राजेंद्र काटवे, माजी सभागृह नेते संजय कोळी, एमएसईडीसीएलचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड, महारूद्र हावळे, सोलापूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तपन डंके, प्रसाद कुलकर्णी, प्रधानमंत्री आवास योजनेचे नागनाथ पदमगोंडा, सिद्धाराम मेनकुदळे, एमएसईबीचे अधिकारी मुल्ला, अमोल काटकर, राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, सचिव अण्णाराव कानडे उपस्थित होते.
यावेळी संगणकीकृत पद्धतीने सोडत काढून २०० जणांची निवड करण्यात आली. तसेच या गृहनिर्माण प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, अंतर्गत विद्युत व्यवस्थापैकी विकासकामांचे उद्घाटनही आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून सोडत काढण्यात आली.
याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. दहिटणे येथील ७० एकर परिसरात एकूण ५ हजार घरे उभारण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील १२०० घरे बांधून पूर्ण झाली आहेत. त्यातील ६७५ लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यात घरांच्या चाव्या मिळणार आहेत. उर्वरित घरे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून असंघटित कामगार, बांधकाम कामगार, भाजीविक्रेते यांच्यासाठी ही घरे उभारण्यात आली आहेत. केवळ ७५ हजार रुपयांपासून ३ लाख ७१ हजार रुपयांपर्यंत कामगारांना घरे मिळत आहेत. सोलापूरच्या जनतेने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या सरकारच्या पाठीशी उभे रहावे. महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेश दिड्डी, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन श्वेता हुल्ले यांनी केले.