जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते  प्रमाणपत्र देऊन सन्मानित

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांनी खूप मेहनत घेतलेली होती. तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ही त्यांनी प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून हा कार्यक्रम यशस्वी केला. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याप्रमाणे महापालिका क्षेत्रात या योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेली उगले, तर ग्रामीण भागात चांगले काम केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

उपसा जलसिंचन योजनांच्या सौरऊर्जीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

राज्यातील २४२ शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी २ हजार ७७३ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

लाडक्या बहिणींना धनादेश वाटप 

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण ४८१ कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत, त्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात १५ महिला लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पिंक ई- रिक्षा, लेक लाडकी योजना, मोफत गॅस सिलेंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

प्रशासनाच्यावतीने नेटके आयोजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा समारंभाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत नेटके आयोजन करण्यात आलेले होते. जवळपास ४० हजार महिलांना त्यांच्या गावातून ने – आण करण्यासाठी साडेतीनशे पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. पार्किंगची व्यवस्था, महिलांना जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आलेली होती. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रत्येक बाबींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून स्वतःच्या नियंत्रणाखाली सर्व कामे व्यवस्थितपणे करून घेत असल्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडलेला आहे.

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार

सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या गृहप्रकल्पाला राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सात कोटीचा निधी दिलेला आहे. त्या अनुषंगाने श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्यासह त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *