प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी यांची प्रमुख उपस्थिती
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : गीता परिवाराचा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार ख्यातनाम शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांना सोमवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराज कथा कार्यक्रमात गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते डॉ. शिवरत्न शेटे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, डॉ. सुप्रज्ञा शेटे, गीता परिवाराचे उपाध्यक्ष हरिनारायण व्यास, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या संगीता जाधव, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ओम दरक, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र आयोध्याचे आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख सी. ए. राजगोपाल मिणीयार, हेमंत पिंगळे उपस्थित होते.
राष्ट्र, धर्म, समाजासाठी जाणीव जागृतीचे उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना गीता परिवारातर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते. स्मृतिचिन्ह, मानपत्र, महावस्त्र आणि ७१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी आजवर शेकडो व्याख्यानांच्या माध्यमातून समाजाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चरित्र सांगितले आहे. तसेच दरवर्षी वर्षभरातून दोन वेळा गडकोट मोहिमा आयोजित करून आजवर हजारो शिवभक्तांना गडकोटांच्या सानिध्यात श्री शिवचरित्र समजावून सांगितले आहे. त्याचबरोबर ‘चला संस्कार जपूया’ या व्याख्यान मालिकेतून विशेषतः तरुणींसह संपूर्ण कुटुंब प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर हजारो नागरिकांची जाणीवजागृती केली आहे. डॉ. शेटे यांच्या या कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक हरिनारायण व्यास यांनी केले. सूत्रसंचालन गुरूशांत धुत्तरगावकर यांनी यांनी तर आभार प्रदर्शन सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी केले.
============================================================================================
याप्रसंगी प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी म्हणाले, डॉ. शिवरत्न शेटे यांचे कार्य उत्तुंग आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल त्यांनी केलेली जनजागृती कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी डॉ. शेटे म्हणाले, श्री शिवचरित्रावर भगवान श्रीकृष्ण यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. संपूर्ण शिवचरित्र हे जणू कृष्णनीतीला वाहिले आहे, असे भगवान श्रीकृष्णांच्या आणि श्री शिवचरित्राच्या अभ्यासातून दिसते. युद्ध, तह, आक्रमण असो किंवा राजनीति असो या प्रत्येकवेळी छत्रपती श्री शिवरायांनी अत्यंत बुद्धिमत्तेने आणि सावधपणे निर्णय घेऊन धर्म रक्षणाचे काम केले.