मी कोण्याच्या नेतृत्वाखाली काम करीत नाही; माझे नेतृत्व हे केवळ उद्धव ठाकरे आहेत
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : मी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करीत नाही, शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे माझे नेतृत्व असून, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असतो, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) गणेशदादा वानकर यांनी केलेल्या पत्रकार परिषदेतील विधानाने पत्रकार परिषदेत काही क्षण गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. गणेशदादांच्या विधानाचे आता राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गणेशदादा वानकर यांच्या आक्रमकतेनंतर निर्माण झालेली गोंधळलेली परिस्थिती, यावर उपस्थित माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे आणि शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शरद कोळी आणि अमर पाटील, पुरुषोत्तम बरडे मात्र शांत होते. संपूर्ण पत्रकार परिषदेत पुरुषोत्तम बरडे हे शांतच होते. त्यांनी यावेळी अस्मिताताई यांना यामध्ये न बोलण्याचाही सल्ला देताना दिसून आले.
पत्रकार परिषदेदरम्यान मंचावर शिवसेनेचे स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी दिग्गज लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे,उपनेते शरद कोळी, सहसंपर्क प्रमुख उत्तमप्रकाश खंदारे, उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्यासह भीमाशंकर म्हेत्रे हेही उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी काही प्रश्न केले. त्यावेळी पुरुषोत्तम बरडे यांच्यासह उत्तमप्रकाश खंदारे, गणेशदादा वानकर यांना उद्देशून एका पत्रकारांनी प्रश्न केल्याने गणेश वानकर हे चिडल्याचे दिसून आले. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांचा गुरुवारी मेळावा आयोजित केला असून, या मेळाव्यास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार असून, यासोबातच अमर पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही संजय राऊत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील देत होते. त्यावेळी पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, पुरुषोत्तम बरडे हे उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने एक असा प्रश्न केला की, त्यामुळे गणेशदादा वानकर चिडले. प्रश्न असा होता की, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील गुरुवारी होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
या पत्रकार दोन दिग्गज उपनेते यांचीदेखील उपस्थिती आहेत. उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार आहे. याची माहिती देण्यासाठी उपस्थित पत्रकार परिषदेस आपली उपस्थिती असूनही आपण गप्प का? असा सवाल पत्रकारानी करताच मधूनच अचानक गणेशदादा वानकर हे उठले आणि म्हणाले, आपण थेट मातोश्रीवरील उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केले असून, आपण कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही, आपले नेतृत्व हे उद्धव ठाकरेच आहेत, केवळ ठाकरे फमिली, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे पत्रकार परिषदेदरम्यान काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी खंदारे आणि अस्मिताताई यांनी सारवा सराव करण्याचा प्रयत्न केला. आजची पत्रकार परिषद ही शिवसैनिकांच्या मेळाव्यासंदर्भात असून, तेवढेच प्रश्न विचारा असे सांगून गणेशदादानी पत्रकार परिषद थांबविण्याचा सल्लाही दिला.