साठ हजारहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत ३.३५ लाख रोजगारासाठी २.८५ लाख युवक-युवतींनी आपली मागणी नोंदवली आहे. यापैकी १.१० लाख जणांना प्रत्यक्षात रोजगार प्राप्त झाला असून, ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी, शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली.
याविषयीची अधिक माहिती देतान मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की “भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देवून, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.”
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि त्या खालोखाल अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ५००० युवा रुजू झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असे मंत्री लोढा म्हणाले.
या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत १० लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दीष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून, युवकांनी आणि उद्योगांनी देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन लोढा यांनी यावेळी केले.