जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद: जिल्हास्तरीय रानभाजी, मिलेट महोत्सव-२०२४
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते रानभाजी, मिलेट महोत्सवाचे उद्घाटन
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी रानभाज्या व तृणधान्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहारात रानभाज्या व तृणधान्याला अधिक महत्त्व द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये आयोजित रानभाजी व मिलेट महोत्सव उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी पुणे येथील आत्माचे संचालक अशोक किरनळी, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्मा प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपसंचालक शीतल चव्हाण, पर्यवेक्षक अनिता शेळके, निलिमा हरसंगमा, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे दिनेश क्षीरसागर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, रानभाज्या मध्ये औषधी गुण आहेत, त्यामुळे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. प्रत्येक रानभाजीचे एक गुणधर्म आहे. तसेच तृण्य धान्य ही आरोग्यास पोषक आहेत. जागतिक पटलावर ही तृणधान्यचे महत्व आधोरेखित झाले आहे. त्यामुळे हा महोत्सव रानभाजी व मिलेटचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या महोत्सवाच्या माध्यमातून रान भाजी व मिलेटचे महत्व लक्षात घेऊन आपल्या रोजच्या आहारात बदल करावा. व आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
आत्मा संचालक किरनळी यांनी ही रान भाज्यांचे महत्व विशद करून नागरिकांनी महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले. तर जिल्हा कृषी अधीक्षक गावसाने यांनी प्रास्ताविक केले. मानवी जीवनात अन्नाला महत्व आहे. त्यात ही रानभाज्या विशेष महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणून राज्य शासन मागील आठ वर्षापासून हा महोत्सव आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते फीत कापून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन रानभाज्यांचे महत्त्व आपल्या आरोग्यामध्ये किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेतले. (मिलेट) तृणधान्यापासून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देऊन काही पदार्थांचा आस्वादही घेतला. तसेच रान भाज्या तसेच तृण धान्य उत्पादन घेणाऱ्या शेतकरी व महिला बचत गटांचे विशेष कौतुक त्यांनी केले. तसेच यावेळी कृषी विभागाच्या पुस्तिकेचे ही प्रकाशन झाले. या महोत्सवास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवास उपस्थित मान्यवरांचे तसेच उपस्थित शेतकऱ्यांचे आभार प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी मानले.
========================================================================================
उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान
प्रत्येक तालुक्यातील एक शेतकऱ्यांचा येथे सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रणव बिराजदार (निंबर्गी), विलास टेकाळे (पापरी, मोहोळ), वासुदेव गायकवाड (चळेगाव), सत्यवान लेंगरे (आंधळगाव, अपंग शेतकरी), राहुल काळे (नातेपुते), महेंद्र देशमुख (कुंभारगाव). तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थ महिलाबचत गटांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्या मेहता, अनुराधा बनसोडे, रेखा हजारे, सुरेखा होटगीकर, बबिता जाधव, वंदना अवताडे या महिलांचा प्रशिस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. या खाद्यपदार्थांचे पर्यवेक्षण करण्याचे काम निलिमा हरसंगमा, अनिता शेळके, दिनेश क्षीरसागर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.