सोलापुरात दोन दिवस जल्लोष लोककलेचा !

 जल्लोष लोककलेचा : दोनशे बाल कलावंतांचा सहभाग
बालरंगभूमी परिषद सोलापूर शाखेचा उपक्रम

सिनेअभिनेत्री नीलम शिर्के यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था बालरंगभूमी परिषद मुंबई, यांच्यावतीने ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित ‘जल्लोष लोककलेचा’ हा बालकलावंतांचा महोत्सव होणार आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर- यलगुलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा आणि सिनेअभिनेत्री नीलम शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर रविवारी १ सप्टेंबर रोजी समारोप खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सुहासिनी शहा यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखा करीत आहे.
बालरंगभूमी परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रात बालकांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मुंबईची घटक संस्था आहे. ही संस्था मुलांना नाट्य, अभिनय, गीत-गायन, नृत्य, काव्य या व इतर अशा अनेक कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिर व स्पर्धांचे आयोजन करीत असते. याचाच एक भाग म्हणून बालकलावंतांना महाराष्ट्रातील लोककलावंतांची ओळख व्हावी, यासाठी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा आस्वाद सोलापुरातील नाट्यरसिकांनी घ्यावा, असे आवाहन सीमा यलगुलवार यांनी केले आहे. या परिषदेला अर्चना अडसूळ परिषदेला श्रध्दा हुलेनवरू, सुभाष माने, सुनंदा शेंडगे, मिलिंद ठोंबरे, सुमित फुलमाम्डी, सल्लागार पद्माकर कुलकर्णी, किरण फडके,कार्यकारिणी सदस्य, सल्लागार मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

=========================================================================================

या महोत्सवातून २५ संघ आणि ५० बालकलाकार निवडले जाणार आहेत. यासाठी बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर आदि भागातून दोनशे बालकलाकारांनी सहभाग नोंदवला आहे.शनिवारी ३१ ऑगस्ट व रविवारी १ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव केवळ महाराष्ट्रातील लोककला प्रकारातील गीत, नृत्य व वाद्य यावर आधारित असणार आहे. ‘जल्लोष लोककलांचा’ या दोनदिवसीय महोत्सवात सहभागी झालेल्या बालकलावंतांना व त्यांच्यासोबत येणाऱ्या शिक्षकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखा यांच्यावतीने करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *