“हरि सर्वोत्तमा, वायु जीवोत्तमा” च्या जयघोषात श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवास प्रारंभ

श्री राघवेंद्र स्वामीजींच्या  भाविक-भक्तांची अलोट गर्दी : बुधवारी मध्याराधना

by assal solapuri ||

सोलापूर : “हरि सर्वोत्तमा, वायु जीवोत्तमा’ च्या गजरात ३५३ व्या श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवास मंगळवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या मुरारजी पेठ आणि काळजापूर मारुती मंदिराजवळील शाखांमध्ये मंगळवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

जगद्गुरु श्री मन्मध्वाचार्य मूलमहासंस्थान श्री राघवेंद्र स्वामी मठ, मंत्रालय येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधिपती श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या आज्ञेनुसार हा आराधना महोत्सव होत आहे.

आराधना महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी गोपूजा, ध्वजारोहण, धान्य पूजा, लक्ष्मीपूजा व प्रार्थनोत्सव, स्वस्तिवाचन, महामंगलारती करण्यात आली. श्रावण पौर्णिमेनिमित्त सोमवारी सकाळी ८ वाजता मुरारजी पेठ येथील मठात ऋग्वेदी व यजुर्वेदी नित्य- नूतनोपाकर्म झाले.

मंगळवारी पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी १२ वाजता तुलसी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगलारती करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांना तीर्थप्रसाद, महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना महाप्रसादासाठी केळीच्या पानांची सोय करण्यात आली होती. रात्री ८ वाजता पालखी सेवा, रथोत्सव, स्वस्तिवाचन, महामंगलारती व श्रेय प्रार्थना झाली. त्याचबरोबर गीता हेगडे व सहकाऱ्यांचा भक्ती गीत कार्यक्रम भाविकांसमोर सादर झाला. दिवसभर झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

तीन दिवस चालणाऱ्या श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवास भाविकांनी तन-मन-धनाने सेवेस उपस्थित रहावे, असे आवाहन श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे करण्यात आले आहे.

============================================================================================

बुधवारी मध्याराधना

बुधवार, दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मध्याराधना प्रयुक्त लक्ष पुष्पार्चन व तुळशी अर्चना करण्यात येणार आहे.सायंकाळी ६:३० वाजता गायक प्रशांत देशपांडे व सहकाऱ्यांचा भक्तीगीत कार्यक्रम मुरारजी पेठ येथील मठात सादर होणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *