महिला दिनी महापालिका देणार 227 विद्यार्थिनींना सायकली भेट

महिला दिनी महापालिका देणार 227 विद्यार्थिनींना सायकली भेट

  • आयुक्त शितल तेली-उगले यांची माहिती

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेच्या शाळेतील आठवी आणि नववीत शिकणाऱ्या 227 विद्यार्थिनींना महिला दिनानिमित्त सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली. 
     महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्या संकल्पनेतून यंदाच्या वर्षीपासून हा नवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहे. त्याची सुरुवात महिलादिनी होत आहे. हा कार्यक्रम महापालिकेच्या कॅम्प शाळेत येत्या 8 मार्च रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. महापालिकेच्यावतीने असा उपक्रम पहिल्यांदाच हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त शितल तेली-उगले, उपायुक्त विद्या पोळ, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
     महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना शाळेत येताना वाहनाची अडचण येऊ शकते. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होऊ नये. या मुख्य उद्देशातून महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान दहावी पूर्वीच एखाद्या विद्यार्थिनीने शाळा सोडल्यास त्यांच्याकडून दिलेली सायकल परत घेण्यात येणार आहे. दहावीपर्यंतचे पूर्ण शिक्षण घ्यावे, हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
     या दिवशी महापालिकेच्या सर्व शाळेतील आठवी आणि नववीच्या मिळून 227 मुलींना सायकली देण्यात येणार आहेत. या सायकली कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक यांच्या सीएसआर फंडातून देण्यात येणार आहेत. याशिवाय सरकारचे प्रशासकिय सल्लागार प्रविणसिंह परदेशी यांच्या कन्येने तब्बल एक लाख रुपयांची मदत केल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली. 
कोट
आयसीआयसीआय बँक देणार सव्वा कोटी रुपये
महापालिकेच्या कॅम्प शाळेच्या सुशोभीकरणासाठी आयसीआयसीआय बँक आपल्या सीएसआर फंडातून तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च करणार आहे. याशिवाय शाळेत सर्व सुविधायुक्त प्रसाधन गृह उभारण्यासाठी एचडीएफसी बँक आपल्या सीएसआर फंडातून 85 लाख रुपये देणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *