
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे सोमवारी उद्घाटन
- सोलापूर विद्यापीठाच्या चौथ्या नामविस्तार दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा चौथ्या नामविस्तार दिनाचा सोहळा येत्या 6 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रा”चे उद्घाटन होणार असल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
सोमवारी, 6 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम होईल. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन” केंद्राचे उद्घाटन होईल. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कल्याणकारी नेतृत्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
या कार्यक्रमांचा विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यासन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे.