सोलापूर : प्रतिनिधी
मध्य रेल्वेला (Central Railway) एप्रिल ते जून 2023 या तीन महिन्याच्या कालावधीत भंगाराच्या विल्हेवाटातून चक्क 81 कोटी 64 लाख रूपये मिळाले आहे. (81 crores to Central Railway from scrap) त्यामुळे याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
मध्य रेल्वेने शून्य स्क्रॅप मिशन (Zero Scrap Mission) राबवले आहे. ज्यामध्ये रेल्वेतील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त करण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने मध्य रेल्वेने “झिरो स्क्रॅप मिशन”साठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यामध्ये एप्रिल ते जून 2023 या कालावधीत सर्व ठिकाणचे भंगार एकत्रित विक्री केले. ज्यातून 81 कोटी 64 लाख रूपये मिळाले. एप्रिल ते जून 2023 या कालावधीतील उद्दिष्टापेक्षा 36.06% जास्त उद्दीष्ट रेल्वेने साध्य केले आहे. तसेच मध्य रेल्वेचे भंगार विक्रीचे वार्षिक उद्दिष्ट 300 कोटी रूपयांचे आहे. 2023 साठी पं. गोविंद बल्लभ पंत शिल्डच्या निकषांमध्ये 22 पैकी 10 पॅरामीटर्समध्ये मध्य रेल्वे क्रमांक 1 वर आली आहे. भंगाराची विक्री मध्य रेल्वेच्या सर्व 5 विभागांत उदा. मुंबई (माटुंगा कार्यशाळा), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर येथे विविध ठिकाणी करण्यात आली. विकल्या जाणार्या भंगाराच्या प्रमुख वस्तूंमध्ये EMU कोच, ICF कोच, लोकोमोटिव्ह, वॅगन्स आणि इतर भंगाराचा समावेश होता.
ई-खरेदी प्रणालीव्दारे विक्री – गव्हर्नमेंट ई मार्केट (GeM Portal) मध्य रेल्वेची एक ऑनलाइन ई-खरेदी प्रक्रीया आहे. या प्रणालीव्दारे साहित्य खरेदी आणि विक्री केली जाते. ज्यामध्ये पारदर्शकता आहे. या भंगार विक्रीमुळे मध्य रेल्वेच्या महसुलातही मोठी बचत झाली आहे.